MS Dhoni : धोनीच्या वर्ल्डकप फायनलमधील षटकाराचा होणार विशेष सन्मान; वानखेडेमध्ये बनणार ‘विक्ट्री मेमोरियल’ | पुढारी

MS Dhoni : धोनीच्या वर्ल्डकप फायनलमधील षटकाराचा होणार विशेष सन्मान; वानखेडेमध्ये बनणार 'विक्ट्री मेमोरियल'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने २०११ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या विजयाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना जिंकला होता. तब्बल २८ वर्षांनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयी षटकार ठोकून विश्वचषक पटकावला. त्याच्या या षटकारला विशेष सन्मान दिला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवरील विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ ‘विजय स्मारक’ (विक्ट्री मेमोरियल) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) धोनीच्या षटकाराचा चेंडू ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी विक्ट्री मेमोरियल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, “एमसीए ऍपेक्स कौन्सिलने वानखेडे स्टेडियमवर २०११ च्या विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ एक विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या ऐतिहासिक विजयी षटकाराच्या ठिकाणी ते बांधले जाईल.”

८ एप्रिलला उद्घाटन, धोनीचा होणार सन्मान

एमसीएचे अध्यक्ष काळे म्हणाले की, “मंगळवारी (४ एप्रिल) याबाबत महेंद्रसिंह धोनीशी संपर्क साधला जाणार आहे. विक्ट्री मेमोरियलच्या उद्घाटनासाठी धोनीकडे वेळ मागितला जाईल. ८ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी मुंबईत असताना त्याचे उद्घाटन होईल, अशी एमसीएला आशा आहे. तारीख अद्याप ठरलेली नाही कारण ती पूर्णपणे धोनीच्या संमती आणि उपलब्धतेवर अवलंबून असेल. वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक विक्ट्री मेमोरियलचे उद्घाटन करताना एमसीए धोनीचा सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ल्ड कप फायनलमध्ये काय घडलं?

श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या. महेला जयवर्धने नाबाद शतक (103), कर्णधार कुमार संगकारा (48), नुवान कुलसेखरा (32) आणि थिसारा परेरा (22) यांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेला चांगली धावसंख्या उभारता आली. युवराज सिंग आणि झहीर खानने प्रत्येकी दोन तर हरभजन सिंगने एक विकेट घेतली.

२७५ धावांचा पाठलाग करताना भारताने सेहवाग (०) आणि तेंडुलकर (१८) यांच्या विकेट लवकर गमावल्या. यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली (३५) यांच्यातील ८३ धावांच्या भागीदारीने भारताच्या संधी जिवंत ठेवल्या. गंभीरने १२२ चेंडूत ९७ धावा केल्या आणि कर्णधार एमएस धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. धोनी आणि युवराज (२१) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ५४ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला २८ वर्षांतील पहिले विश्वचषक विजेतेपद मिळाले. धोनीने ७९ चेंडूत ९१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

हेही वाचा : 

 

Back to top button