केएल राहुलने दुबईच्या वाळवंटात धावांचा वादळी पाऊस पाडत चेन्नईचा सुपडासाफ केला. पंजाब किंग्जने आयपीएलच्या आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai vs Punjab ) ६ विकेट्स आणि ७ षटके राखून पराभव केला. पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचे १३५ धावांचे आव्हान ४ फलंदाजाच्या मोबदल्यात १३ षटकातच पार केले. राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची धडाकेबाज खेळी केली.
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज ( Chennai vs Punjab ) समोर १३५ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत पॅवर प्लेमध्येच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. दरम्यान, पंजाब किंग्जच्या या आक्रमक सुरुवातीला शार्दुल ठाकूरने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. त्याने पहिल्यांदा मयांक अग्रवालला १२ धावांवर तर त्याच षटकात सर्फराज खानला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले.
दरम्यान, केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुल एका बाजूने किल्ला लढवत असताना इतर फलंदाज मात्र आल्या पावली परत जात होते. शर्फराज नंतर आलेला शाहरुख खान देखील ८ धावा करुन बाद झाला. एकाकी झुंज देणाऱ्या राहुलने ११ व्या षटकात पंजाब किंग्जचे शतक धावफलकावर लावले.
पंजाब किंग्जच्या शतकाबरोबरच राहुलही आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. दुसऱ्या बाजूने मार्करमनेही आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. मात्र शार्दुल ठाकूरने त्याची ८ चेंडूत १३ धावांची खेळी संपवली. परंतु याला फार उशीर झाला होता. पंजाबला फक्त ७ धावांची गरज होती. पंजाबने १३ षटकात ४ बाद १३९ धावा करुन सामना खिशात टाकला. केएल राहुलने वादळी खेळी करत ४२ चेंडूत ९८ धावा केल्या. त्याने ही खेळी ८ षटकार आणि ७ चौकारांनी सजवली.
तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मधील ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किग्ज ( Chennai vs Punjab ) विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायवाड आणि फाफ ड्युप्लेसिसने डावाची सावध सुरुवात केली.
दरम्यान, पॉवर प्लेचा फायदा उचलण्याच्या क्षणी ऋतुराज गायकवाडला अर्शदीप सिंगने १४ धावांवर बाद केले. गायकवाड बाद झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीला देखील अर्शदीप सिंगने आपल्या पुढच्या षटकात भोपळाही न फोडता माघारी धाडले. पॉवर प्लेमध्येच चेन्नईला दोन धक्के बसल्याने त्यांना ३० धावांपर्यंतच मजल मारता आली.
पॉवर प्लेनंतर चेन्नईला सारवण्यासाठी क्रिजवर रॉबिन उथप्पा आला. मात्र ख्रिस जॉर्डनने त्याला २ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. ख्रिस जॉर्डनने उथप्पा नंतर आलेल्या अंबाती रायडूलाही फार काळ विकेटवर टिकू दिले नाही. त्याने त्याला ४ धावात माघारी धाडले.
संघाचे ५० धावांच्या आत ४ विकेट गेल्यानंतर संघाला सावरण्यासाठी महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. मात्र त्याचा खराब फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. तो फक्त १२ धावांची भर घालू शकला. रवी बिश्नोईने त्यााचा त्रिफळा उडवला. दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या फाफ ड्युप्लेसिस चाळीशीत पोहचला होता. यातबरोबर सीएसकेनेही ८० धावांचा टप्पा पार केला.
हेही वाचा : एमएस धोनी १५ ऑगस्ट २०२० ला का झाला निवृत्त?
फाफ ड्युप्लेसिसने रविंद्र जडेजाला साथीला घेत सीएसकेचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान त्याने आपले झुंजार अर्धशतकही पूर्ण केले. ड्युप्लेसिसने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. मात्र अखेरच्या षटकात मोहम्मद शमीने ड्युप्लेसिसची ही ५५ चेंडूत केलेली ७६ धावांची झुंजार खेळी संपली. अखेर सीएसकेने २० षटकात ६ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली. रविंद्र जडेजाने नाबाद १५ धावा केल्या तर ब्राव्होने चौकार मारत आपले छोटेखानी योगदान दिले.