भारतातील टी -२० वर्ल्डकप युएईला गेल्याने त्यांचा खिसा किती गरम होणार? | पुढारी

भारतातील टी -२० वर्ल्डकप युएईला गेल्याने त्यांचा खिसा किती गरम होणार?

पुढारी ऑनलाईन : टी -२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेची सुरवात ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पूर्वी भारतीय क्रिकेट मंडळाला देण्यात आली होती. परंतु देशातील कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. आयोजक म्हणून भारत कायम असून फक्त स्पर्धा आयोजनाचे ठिकाण बदलले आहे.

बीसीसीआयला युएईमध्ये सामने खेळवण्यासाठी अमिराती क्रिकेट बोर्डाला काही रक्कम द्यावी लागणार आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या 39 सामन्यांसाठी बीसीसीआयला अमिरात क्रिकेट बोर्डाला  ५२.१६ कोटी रुपये द्यावे लागतील. बीसीसीआयला टी -२० विश्वचषकाचे आयोजन करून ८९.४२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. पैशाचा हा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये केला जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शेअर केली आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी टी -20 विश्वचषकाशी संबंधित माहिती मेलद्वारे दिली आहे. या वर्षी होणाऱ्या टी -२० वर्ल्ड कपमध्ये ५० दिवसांच्या आत ३९ सामने खेळले जातील. यूएई आणि ओमानच्या मैदानावर हे सामने खेळले जाणार आहेत. जर हा टी -२० वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला असता आणि मैदानात सर्व प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी दिली गेली असती तर बीसीसीआयला मोठा फायदा झाला असता.

बीसीसीआय टी -२० वर्ल्डकपमध्ये चांगल्या नफ्याची अपेक्षा

भारतीय क्रिकेट मंडळाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना मेल करून सांगितले आहे की बीसीसीआयला टी २० वर्ल्डकमधून मिळणाऱ्या फायद्यातील एकूण ५२.१६ कोटी रुपये अमिराती क्रिकेट बोर्डाला दिले जातील. यापैकी ११.१७ कोटी रुपये स्पर्धेच्या आयोजनासाठी, तर ४०.९८ कोटी रुपये स्पर्धेदरम्यान झालेल्या खर्चासाठी आणि ओमान येथे होणाऱ्या सहा सामन्यांसाठी २.९० कोटी रुपये दिले जातील. या स्पर्धेसाठी तिकिटे विकण्याचा अधिकार अमिरात क्रिकेट बोर्डालाही आहे. ही तिकिटे विकून मिळालेले पैसेही अमिराती क्रिकेट बोर्डाकडे राहतील. बीसीसीआयला स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३३ दिवसात बीसीसीआयला चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकापेक्षा खर्च कमी

बीसीसीआयने सांगितले आहे की या विश्वचषकातून ते सुमारे ९० कोटींचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकाच्या खर्चापेक्षा १८६.२८ कोटी रुपयापेक्षा कमी आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आयोजित केली जाईल. टी २० विश्वचषक २०२१ दरम्यान आयसीसीच्या आवश्यकतांनुसार सर्व काही पुरवण्याची जबाबदारी अमिराती क्रिकेट बोर्डाची असेल, तर ओमानमध्ये होणाऱ्या पहिल्या सहा सामन्यांची जबाबदारी ओमान क्रिकेटची असेल. त्याचबरोबर ओमानमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकीटेही ओमान क्रिकेट बोर्डाकडून विकले जातील.

बीसीसीआय टी-२० विश्वचषकाची व्यवस्था पाहण्यासाठी विशेष समिती नेमणार

बीसीसीआय टी-२० विश्वचषक दरम्यानच्या व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे. यात समितीमध्ये प्रामुख्याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि अमिराती क्रिकेट बोर्डाचे काही अधिकारीही ठेवण्यात आले आहेत. ओमानमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी अशीच एक समिती स्थापन करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही या मेलमध्ये कळवले आहे की यूएईमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. आयसीसीसोबत बैठकांच्या अनेक फेऱ्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button