आयपीएल २०२१ हा एमएस धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असेल असे अनेक जणांना वाटत होते. यंदाच्या हंगामात एमएस धोनी एक फलंदाज म्हणून फारशी चमक दाखवू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्स बरोबर झालेल्या सामन्यात धोनीने २८ चेंडूत फक्त १८ धावा केल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने आता आयपीएलमधून निवृत्ती घ्यावी अशी मागणी होऊ लागली. दरम्यान, एमएस धोनीने स्वतःच आपल्या निवृत्तीबाबत काही संकेत दिले. याचबरोबर त्याने आपण भारतीय संघातून निवृत्त होण्यासाठी १५ ऑगस्ट २०२० ही तारीखच का निवडली याचे कारणही सांगितले.
चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीने आपली ७५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ एक लाईव्ह चॅट कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात धोनीने चेन्नईच्या फॅन्सबरोबर संवाद साधला. या संवादावेळी एका चाहत्याने नाराजीच्या सुरात धोनीला विचारले की तुम्हाला मैदानातून निरोप देता आला नाही. तुम्ही निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट २०२० चा दिवसच का निवडला.
यावर एमएस धोनी म्हणाला की, 'मला मैदानातून निरोप द्यायचा विषय आला आहे तर तुम्ही मला सीएसके कडून खेळताना पाहू शकता. तुम्हाला मला निरोप देण्याची संधी मिळेल. आशा आहे की आम्ही पुन्हा चेन्नईत येईन आणि मी माझा शेवटचा सामना देखील खेळीन.' १५ ऑगस्टलाच निवृत्ती का घेतली या प्रश्नावर उत्तर देताना धोनी म्हणाला की, '१५ ऑगस्ट पेक्षा चांगला कोणता दिवस असू शकत नाही.'
एमएस धोनीने या लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार असल्याचे संकेत दिले. आणि हाच हंगाम त्याचा खेळाडू म्हणून आयपीएलचा शेवटचा हंगाम असण्याचीही शक्यता त्याने बोलून दाखवली. ४० वर्षाच्या धोनीने आयपीएलमध्ये ११ वेळा प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी दमदार झाली आहे. त्याने आपले प्ले ऑफ मधील स्थान निश्चित केले. मात्र संघाचा कर्णधार धोनी फलंदाजीत सातत्याने अपयशी होत आहे. सध्या सीएसके गुणतालिकेत १८ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. चेन्नई आपला साखळी फेरीतील अखेरचा सामना ७ ऑक्टोबरला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकून चेन्नई पुन्हा टॉपवर येऊ शकते.