Team India : कोण बनणार दुसरा ‘बुमराह’? टीम इंडिया तणावात

Team India : कोण बनणार दुसरा ‘बुमराह’? टीम इंडिया तणावात

पुढारी ऑनलाईन डेस्क : jasprit bumrah injury : टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) प्रवेश केला आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होणार आहे. इंग्लंडमधील वातावरणात ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलणे टीम इंडियासाठी सोपे नसेल. सर्व काही सुरळीत राहिल्यास कांगारू संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांसह मैदानात उरतरेल. दुसरीकडे, टीम इंडिया या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय खेळणार आहे.

भारतासाठी बुमराह महत्त्वाचा का आहे?

भारतासाठी बुमराह (jasprit bumrah injury) महत्त्वाचा का आहे? याचे उत्तर डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या पर्वातील (2021-2023) त्याच्या कामगिरीवरून नक्कीच समजू शकते. दुखापतीमुळे बुमराह फक्त 10 कसोटी खेळू शकला. पण, त्याने 19.73 च्या प्रभावी सरासरीने एकूण 45 बळी घेतले. यादरम्यान, बुमराहने तीन वेळा पाच विकेट घेण्याची किमया केली.

डब्ल्यूटीसीच्या (WTC) दुसऱ्या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या टॉप पाच गोलंदाजांपैकी फक्त आर अश्विन (19.67)ची सरासरी बुमराहपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ, बुमराहच्या उपस्थितीने टीम इंडियाची ताकद अनेक पटींनी वाढते आणि तो संघात नसेल तर वेगवाग आक्रमणाची धार कमी होते.

बुमराहचे ऑगस्टपूर्वी कमबॅक होणे अशक्य

जसप्रीत बुमराहच्या (jasprit bumrah injury) पाठीवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, तो ऑगस्टपूर्वी सराव सुरू करू शकणार नाही. बुमराह आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट याधीच स्पष्ट झाले आहे. भारतात होणा-या वनडे विश्वचषकापर्यंत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यावर बीसीसीआयचा भर आहे. कारण टीम इंडियाला गेल्या वर्षी त्याच्या दुखापतीचा फटका बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक खेळू शकला नाही आणि भारत विजेतेपदापासून वंचित राहिला.

बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये खेळला

बुमराहला (jasprit bumrah injury) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले. येथून तंदुरुस्त घोषित झाल्यानंतर बुमराहला जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले. पण, अवघ्या सहा दिवसांनी तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगत श्रीलंका मालिकेतून त्याचे नाव कमी करण्यात आले. बुमराहच्या पुनरागमनाची घाई नको असे खुद्द बीसीसीआयने स्पष्ट केले.

खरं तर, गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बुमराहची टीममध्ये निवड झाली होती. पण, दोन सामने खेळल्यानंतर त्याच्या पाठीची दुखापत पुन्हा बळावली. यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाला बुमराहसोबत धोका पत्करायचा नव्हता. याच कारणामुळे त्याची श्रीलंका, नंतर न्यूझीलंड आणि नंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी निवड झाली नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (jasprit bumrah injury) अंतिम सामना जूनमध्ये ओव्हल येथे खेळवला जाईल. इंग्लंडमधील परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. भारत 2021 मध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि आर अश्विन, रवींद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांसह डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. पण, ही रणनीती कामी आली नाही. न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. यानंतर भारताने इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि टीम इंडिया 4 वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरली. बुमराहच्या जोरावर भारताने 2021 मध्ये लॉर्ड्स आणि ओव्हल कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलमध्येही भारताला हीच रणनीती अवलंबावी लागणार आहे. कारण इंग्लंडमधील हवामान जूनमध्ये थंड असते, पण बुमराहच्या अनुपस्थितीत भारताला चार वेगवान गोलंदाज शोधणे कठीण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारताचे 'ते' चार वेगवान गोलंदाज कोण असतील?

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज तंदुरुस्त राहिल्यास डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती वेगवान गोलंदाज असेल. त्याचबरोबर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यापैकी कुणालाही संधी मिळू शकते. 2018 मध्ये शेवटची कसोटी खेळलेला हार्दिक पंड्या हा चौथ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय असू शकतो. मात्र, भारताची अडचण अशी आहे की बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शमी, सिराज आणि उमेश यादव या तिघांनी प्रभावी गोलंदाजी केली नाही. शार्दुल आणि जयदेव यांनी एकही कसोटी खेळली नाही.

आता यापुढे डब्ल्यूटीसी फायनलपर्यंत टीम इंडिया कसोटी सामने खेळणार नाही. आयपीएल 2023 नंतर ते थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी उतरतील. त्यामुळे येणा-या काळात टीम इंडिया कोणत्या चार वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवून ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news