IND vs AUS ODI : कसोटीनंतर वनडेचा धमाका! हार्दिक पंड्याची ‘मुंबई’त अग्निपरीक्षा | पुढारी

IND vs AUS ODI : कसोटीनंतर वनडेचा धमाका! हार्दिक पंड्याची ‘मुंबई’त अग्निपरीक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया आता कसोटीनंतर वनडे मालिकेत एकमेकांना भिडणार आहेत. पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघाचे खेळाडू मुंबईत पोहोचले असून 15 मार्चपासून दोन्ही संघ सरावाला सुरुवात करणार असल्याचे वृत्त आहे. ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली नाही, ते मायदेशी परतणार आहेत, तर जे खेळाडू कसोटीत नव्हते, पण एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेले आहेत, ते भारतात पोहोचले आहेत.

दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यासाठी कर्णधार बनवण्यात आलेला हार्दिक पंड्या आता नव्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याच्यासमोर मोठे आव्हान आहे. ज्यावर त्याला कोणत्याही किंमतीत मात करायची आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नसून दुसऱ्या सामन्यातून तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

पंड्या पहिल्यांदाच वनडेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार

हार्दिक पंड्या कसोटी मालिकेचा भाग नव्हता पण आता तो वनडेतून पुनरागमन करत आहे. इतकेच नाही तर त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. भारतीय संघाने या वर्षात रोहितच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. हे सर्व सामने टीम इंडियाने जिंकले असून विजयाचा हा धडाका पंड्याला पुढे चालूच ठेवावा लागेल.

टीम इंडियाने या वर्षी आतापर्यंत श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तीन-तीन सामन्यांच्या वनडे सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप दिला आहे. पंड्याने याआधी भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. पण टीम इंडियासाठी तो प्रथमच वनडेमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

वनडेतील दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी (IND vs AUS ODI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये आतापर्यंत 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 53 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 10 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 29 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सक्रिय फलंदाजांपैकी रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 40 सामन्यांमध्ये 61.33 च्या सरासरीने आणि 93.87 च्या स्ट्राइक रेटने 2,208 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे, ऑस्ट्रेलियाच्या सक्रिय फलंदाजांमध्ये स्मिथने भारताविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 21 सामन्यांमध्ये 62.38 च्या सरासरीने आणि 105.05 च्या स्ट्राइक रेटने 1,123 धावा केल्या आहेत. (IND vs AUS ODI)

रोहितनेच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2013-14 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 491 धावा केल्या होत्या.

कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक विकेट घेतल्या?

सक्रिय भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने दोन्ही संघांच्या वनडे सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 19 सामन्यात 6.13 च्या इकॉनॉमीसह 29 बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे अॅडम झाम्पा हा भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 16 सामन्यात 5.64 च्या इकॉनॉमीसह 27 विकेट घेतल्या आहेत. कमिन्सने (14 विकेट) दोन्ही संघांमधील वनडे मालिकेत (5 सामन्यांची मालिका, 2018-19) सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. (IND vs AUS ODI)

भारतीय खेळाडू ‘हे’ मोठे विक्रम करू शकतात

विराट कोहली (12,809) वनडे क्रिकेटमध्ये 13,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. अगामी वनडे मालिकेत त्याची बॅट तळपली तर तो अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. रोहित वनडेत 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 18 धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत 241 सामन्यात 9,782 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा (2,247) वनडेमध्ये 2,500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 53 धावा कमी आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल (121 विकेट) हा जसप्रीत बुमराह (121) आणि रवी शास्त्री (129) यांना विकेट्सच्या बाबतीत मागे राहू शकतात.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘हे’ विक्रम करू शकतात

स्मिथ (4,917) वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. अशी कामगिरी करणारा तो 17वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरणार आहे. ट्रॅव्हिस हेड (1,823) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा पार करू शकतो. जर तो यात यशस्वी झाला तर तो मॅथ्यू वेड (1,867) आणि किम ह्यूज (1,968) यांना मागे टाकेल. ॲडम झाम्पा (127) माजी अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स (133) यांना मागे टाकू शकतो. असे केल्यास तो या वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 13वा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.

पहिला वनडे सामना मुंबईत

वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च (शुक्रवार) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये 19 मार्चला (रविवार) तर तिसरा सामना 22 मार्चला (बुधवार) चेन्नईत खेळवला जाणार आहे.

Back to top button