IND vs AUS ODI : वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना एन्ट्री मिळण्याची शक्यता | पुढारी

IND vs AUS ODI : वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना एन्ट्री मिळण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका आता संपली असली तरी कांगारूंचा दौरा अजून शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियन संघाला आता भारताविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, असे अनेक खेळाडू या वनडे मालिकेत पुनरागमन करणार आहेत, जे अद्याप कसोटी मालिकेत दिसले नव्हते.

दरम्यान, रोहित शर्मा वनडे संघात असला तरी पहिल्या वनडेत तो दिसणार नाही, त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर असेल. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हार्दिक पंड्या पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करेल.

रोहित शर्मा पहिल्या वनडेतून बाहेर

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिला वनडे सामना खेळणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पंड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. अशातच रोहितच्या अनुपस्थितीत संघाची सलामीची जोडी कशी असेल, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या सामन्यात शुभमन गिल आणि ईशान किशन सलामी देण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात या दोन्ही खेळाडूंनी केवळ टी-20च नाही तर वनडे क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहलीचे आगमन जवळपास निश्चित असून यानंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक येईल. सूर्या पहिल्या कसोटीनंतर सातत्याने संघासोबत होता, परंतु इतर तीन कसोटीत तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. यानंतर पाचव्या क्रमांकावर केएल राहुलने दावा केल्याची कुजबुज सुरू आहे. राहुल पहिले दोन कसोटी सामने खेळला, मात्र खराब फॉर्म पाहता त्याला शेवटच्या दोन कसोटीतून डच्चू देण्यात आला. पण श्रेयस अय्यर जखमी झाल्याने अगामी तीन वनडे सामन्यात राहुलला संधी मिळू शकते असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. (IND vs AUS ODI)

हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा मॅच विनर होऊ शकतात

टॉप 5 नंतर, कर्णधार हार्दिक पंड्या स्वतः सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो, तर रवींद्र जडेजाही या मालिकेत सातव्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. यानंतर शार्दुल ठाकूरला संधी मिळेल. जो गोलंदाज म्हणूनही आपले काम चोख बजावेल. परंतु गरज पडल्यास तो फलंदाजीतही चमक दाखवेल अशी आशा आहे. म्हणजेच टीम इंडियाची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत आहे. यानंतर कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. जो संपूर्ण कसोटी मालिकेत एकही सामना खेळू शकला नाही. त्याचबरोबर या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराज आणि शमीला वेगवान गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. (IND vs AUS ODI)

अशा प्रकारे टीम इंडियात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात तीन वेगवान गोलंदाज आहेत. कर्णधार हार्दिक पंड्या देखील गरज पडल्यास मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. म्हणजे एकूण चार वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात येईल. यानंतर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा फिरकी विभागाची धुरा सांभाळू शकतात.

अशाप्रकारे भारताकडे एकूण सहा गोलंदाज आणि आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असेल. ऑस्ट्रेलियन संघाने कसोटी मालिका गमावल्यामुळे त्यांना वनडे मालिकेची सुरुवात चांगली करायची आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेता येणार नाही. पहिला सामना मुंबईत होणार आहे. येथील खेळपट्टी अनेकदा फिरकीपटूंना अनुकूल असते. त्यामुळे कर्णधार पंड्या कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतो आणि कसोटीनंतर वनडेमध्ये संघाची कामगिरी कशी होते याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Back to top button