

इंदोर; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट संघातील एका दिग्गज फलंदाजाची कारकिर्द बहुदा शेवटाकडे पोहचली आहे. या फलंदाजासाठी सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असेलेली बॉर्डर-गावस्कर मालिका त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरु शकते. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो मध्यफळीतील भक्कम फलंदाज चेतेश्वर पुजारा आहे. कदाचित हे त्यांच्या चाहत्यांना आवडणार नाही. पण, आकडे काहीसे असेच बोलत आहेत किंवा सुचवत आहेत. (IND vs AUS 3rd Test)
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या बचावात्मक फलंदाजीवर सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या ६ कसोटी डावांमध्ये चेतेश्वर पुजाराने एकदाही ३५ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत, त्यामुळे याचा टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत चेतेश्वर पुजाराने ४ कसोटी डावात केवळ ७, ०, ३१ नाबाद आणि १ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचे ३ व्या क्रमांकाचे स्थान धोक्यात आले आहे. (IND vs AUS 3rd Test)
चेतेश्वर पुजाराच्या या खराब कामगिरीनंतर त्याच्या कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली असे म्हणावे लागेल. प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखण्यासाठी बचावात्मक न राहता धावा कराव्या लागतात, मात्र पुजाराच्या फलंदाजीत बचाव जो त्यांचा प्रमुख अस्त्र आहे त्यातच सातत्याने कमतरता दिसू लागली आहे. त्यामुळे धावांसाठी त्याला झगडावे लागत आहे. टॉप ऑर्डर ही भारताची ताकद आहे, जी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना वगळता दुसऱ्या कसोटीत आणि तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फ्लॉप झाल्याचे दिसून येत आहे. (IND vs AUS 3rd Test)
इंदोरमध्ये तिसरा सामना सुरू झाल्यानंतर टीम इंडियासोबत असे काही घडले, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. पहिल्या डावात टीम इंडिया केवळ १०९ धावांत आटोपली. चाहत्यांना चेतेश्वर पुजाराकडून काही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण पुन्हा एकदा त्याने निराश केली व तो केवळ १ धाव करून बाद झाला. चेतेश्वर पुजाराला ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर नॅथन लायनने क्लीन बोल्ड केले.
कोण घेऊ शकतो पुजाराची जागा ?
आता तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजाराच्या स्थानावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. चेतेश्वर पुजाराने १४ डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेश दौऱ्यावर शेवटचे शतक केले. पुजाराने तेव्हा चितगावमध्ये १०२ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने एकही शतक झळकावलेले नाही, टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे. तिसर्या क्रमांकावर पुजाराच्या जागी मयंक अग्रवाल चांगला पर्याय ठरू शकतो. चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराने १०१ कसोटीत ४३.८१ च्या सरासरीने ७,०५३ धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०६ आहे. पुजाराने कसोटी कारकिर्दीत ३ द्विशतके झळकावली आहेत.
कौंटीमध्ये धावांचा पाऊस अन् भारतात दुष्काळ
गेली काही दिवसांपासून चेतेश्वर पुजारा सातत्याने अपयशी ठरलेला आहे. त्याच्या स्ट्राईक रेट वरुन नेहमी चर्चा होत राहिली आहे. फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी पुजाराने इंग्लंडमध्ये जाऊन कौंटी क्रिकेट खेळला. या ठिकाणी त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला होता. तसेच बॉर्डर-गावस्कर मालिके आधी त्याने फिरकीचा यशस्वी सामना करण्यासाठी खड्डे असणाऱ्या व खराब खेळपट्टीवर खेळण्याचा भरपूर सराव केला होता. पुजारा टी २० व वन डे क्रिकेट खेळत नाही. तर आयपीएलमध्ये सुद्धा त्याला त्याची फ्रँचाईजी संघ सातत्याने खेळवताना दिसत नाही. फक्त कसोटी क्रिकेट खेळणारा पुजारा सातत्याने अपयशी होताना दिसत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला पर्याय शोधत आहेत.
अधिक वाचा :