INDvsAUS Test : ऑस्ट्रेलियाची आघाडी, टीम इंडियाचेही कमबॅक | पुढारी

INDvsAUS Test : ऑस्ट्रेलियाची आघाडी, टीम इंडियाचेही कमबॅक

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsAUS Test : मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने इंदूरमध्ये भारतावर पलटवार केला. टॉस जिंकून पहिला फलंदाजी करणा-या यजमान भारतीय संघाला कांगारूंनी 109 धावातच गारद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात चार विकेट गमावून 156 धावा केल्या आणि भारतावर 47 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. रवींद्र जडेजाने चार विकेट घेत भारताच्या काहीशा आशा उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 60 तर मार्नस लॅबुशेनने 31 धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ 26 धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला नाचवणारी टीम इंडिया इंदूर कसोटीत मात्र आपल्याच चक्रव्यूहात अडकली आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित सेनेचे दहा शिलेदार अवघ्या 32.2 षटकात 109 धावांतच गारद झाले. होळकर स्टेडियमवर पहिल्याच दिवशी कांगारूंच्या फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी करून यजमान संघाच्या एकाही फलंदाजा क्रिजवर टीकू दिले नाही. भारताचे दिग्गज फलंदाज मैदानात कधी आले आणि कधी निघून गेले हे कळलेच नाही. मॅथ्यू कुहनेमनने 5 आणि नॅथन लियॉनने 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या.

कुहनमनने भारतीय फलंदाजीला लावला सुरुंग

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस मैदानात उरतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्या तासात नवख्या मॅथ्यू कुहनमनने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित पुढे आला. इथे कुहनमनने त्याला चकवले आणि रोहितचा (12) फटका हुकला. यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात चेंडू जाताच त्याने भारतीय करणधाराला यष्टिचित केले. त्यानंतर कुहनेमनने गिलला (21) स्लिपमध्ये कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. यानंतर नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1) आणि रवींद्र जडेजा (4) यांना बाद केले. श्रेयस अय्यरला शुन्यावर बाद करून कुहनमनने भारताला 5वा झटका दिला.

विराट कोहलीने काही काळ एक टोक राखून धरले. पण टॉड मर्फीने त्याला पायचित करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीने 52 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर केएस भरतला नॅथन लायनने पायचित केले. उपहारापर्यंत भारताची अवस्था 7 बाद 84 धावा अशी झाली होती. सलग दोन कसोटीत अर्धशतक झळकावणारा अक्षर पटेल आर अश्विन सोबत काही तरी चमत्कार करेल अशी आशा चाहत्यांना होती, पण उपहारानंतर पुन्हा एकदा कुहनमनची जादू पहायला मिळाली. त्याने अश्विन आणि उमेश यादवची शिकार करून पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. उमेशने 17 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने दोन उत्तुंग षटकार खेचले. त्यामुळे भारताची धावसंख्येने कशीबशी शंभरी पार केली. मोहम्मद सिराज धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेल 33 चेंडूत 12 धावा करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात, पण…

प्रत्युत्तरार ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात खराब झाली. 12 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या दुसर्‍याच षटकात जडेजाने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला (9) पायचित केले. हेड बाद झाल्यानंतर मार्नस लॅबुशेन मैदानात उतरला. त्याला खातेही उघडता आले नव्हते तेव्हा त्याला जडेजाने क्लिन बोल्ड केले. पण तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय पंचांनी दिला. यानंतर लॅबुशेनने ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी जडेजानेच फोडली. लॅबुशेन 31 धावा करून तंबूत परतला. तर ख्वाजाच्या (60) रुपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला. दिल्ली कसोटीत स्मिथला अडचणीत आणणाऱ्या जडेजाने इंदूरच्या मैदानावर त्याला सतावले आणि 26 धावांवर स्मिथला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. दिवसाअखेर पीटर हँड्सकॉम्ब (7) आणि कॅमेरून ग्रीन (6) नाबाद माघारी परतले.

लाल मातीच्या खेळपट्टीवर कागारूंची फिरकी प्रभावी

फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्याची रणनीती भारतासाठी धोकादायक ठरली. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी लाल मातीने बनवलेल्या खेळपट्टीचा फायदा उठवला. पहिल्या दोन कसोटींप्रमाणे, खेळपट्टी फिरकीपटूंना खूप अनुकूल असेल अशी अपेक्षा होती पण होळकर स्टेडियमच्या खेळपट्टी पहिल्या तासात वळणदार ठरली. काही प्रसंगी चेंडूला कमी उंची मिळायची. जे आश्चर्यकारक होते.

केएल राहुलला बसवले कट्ट्यावर

फॉर्ममध्ये नसलेल्या लोकेश राहुलच्या जागी शुभमन गिलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तर मोहम्मद शमीला विश्रांती देऊन उमेश यादवला संधी देण्यात आली. दुखापतीतून सावरत ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्क आणि कॅमेरॉन ग्रीनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. स्टार्कने पहिल्याच षटकात स्विंग होणाऱ्या चेंडूंवर रोहितला सतावले. पहिल्याच चेंडूवर रोहित बाद झाला होता. चेंडू बॅटची कड घेऊन विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या हाती गेला होता. पण ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतला नाही आणि अशाप्रकारे रोहितला जीवदान मिळाले.

मर्फीची अनोखी हॅट्ट्रीक

ऑस्ट्रेलियाचा नवखा फिरखीपटू टॉड मर्फी विराट कोहलीसाठी सलग तिन्ही कसोटींमध्ये त्रासदायक ठरला आहे. नागपूर कसोटीत मर्फीने पहिल्यांदा विराट कोहलीची शिकार केली होती. त्यानंतर दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावातही मर्फीने विराटला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा इंदूर कसोटीत मर्फीने विराटला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. विराटला मर्फीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होऊन तंबूत परतावे लागले. अशा प्रकारे मर्फीने सलग तीन कसोटीत दिग्गज विराट कोहलीची विकेट घेऊन आपल्याकडे लक्ष वेधले आहे.

रोहित एका डावात तीनदा बाद

भारताकडून सलामीला रोहित आणि गिल मैदानात उतरले. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. डावातील पहिलाच चेंडू रोहितच्या बॅटच्या काठाला लागला. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने अपील केले, परंतु मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी त्यास नकार दिला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही डीआरएस घेतला नाही. नंतर टीव्ही स्क्रीनवरील रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागून विकेटच्या मागे गेल्याचे स्पष्ट दिसले. यानंतर त्याच षटकातील चौथा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला. स्टार्कने अपील केले, पण बाकीच्या खेळाडूंनी त्याला साथ दिली नाही. कर्णधार स्मिथने पुन्हा एकदा डीआरएस घेतला नाही. नंतर रिप्लेमध्ये रोहित एलबीडब्ल्यू आऊट असल्याचे दिसून आले. स्मिथने डीआरएस वापरला असता, तर रोहित दोन्ही वेळी बाद झाला असता. मात्र, तसे न झाल्याने रोहितला जीवदान मिळाले. या दोन्ही जीवदानाचा फायदा रोहितला घेता आला नाही आणि तो भारताची पहिली विकेट म्हणून बाद झाला.

‘लायन’ने 12व्यांदा केली पुजाराची शिकार

9व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर नॅथन लायनने चेतेश्वर पुजाराचा त्रिफळा उडला. याचबरोवर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये 12व्यांदा या ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजाचा बळी ठरला. यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पुजाराची डझनभर वेळा शिकार केली आहे. पुजारा व्यतिरिक्त, केवळ महान फलंदाज सुनील गावसकर हे एकमेव भारतीय फलंदाज आहे जे कसोटी क्रिकेटमध्ये 12 वेळा एकाच गोलंदाजाचा बळी ठरले आहेत. गावसकर यांना इंग्लंडचे माजी गोलंदाज डेरेक अंडरवुडने 12 वेळा बाद केले. पुजाराने आतापर्यंत लायनविरुद्धच्या 31 डावांमध्ये 1,205 चेंडूत 12 वेळा विकेट गमावली आहे. याशिवाय लायनने त्याला 45 पेक्षा कमी स्ट्राइक रेटने धावा करण्याची संधी दिली आहे. पुजारा फिरकीला बळी जाण्याची ही सलग 5वी वेळ आहे.

नॅथन लायन मोडला शेन वॉर्नचा विक्रम

लायनने दिवंगत माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. लायन हा आशियाच्या मैदानांवर सर्वाधिक 129 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम वॉर्न यांच्या नावावर होता. वॉर्न यांनी 1992 ते 2006 या काळात आशियामध्ये 127 विकेट घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी आहे, ज्याच्या खात्यात 98 विकेट जमा आहेत. तर द. आफ्रिकेच्या डेल स्टेनने आशियामध्ये 92, इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 82 आणि विंडिजच्या कर्टली वॉल्शने 77 विकेट घेतल्या आहेत. लायन आणि वॉर्न हे दोघेच आशियामध्ये 100 हून अधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत.

षटकार खेचण्यात उमेश यादवची किंग कोहलीशी बरोबरी

उमेश यादवने आपल्या आक्रमक खेळीदरम्यान 13 चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 17 धावा फटकावल्या. याचबरोबर त्याने षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली. विराटने आतापर्यंत 107 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 24 षटकार ठोकले आहेत, तर उमेश यादवने केवळ 55 कसोटी सामन्यांमध्ये 24 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

जडेजाचा लॅबुशेनला ‘पंच’

मार्नस लॅबुशेन हा पाचव्यांदा रविंद्र जडेजाचा बळी ठरला आहे. याचबरोबर जडेजा या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेच्या पाच डावांत जडेजाने लॅबुशेनला आतापर्यंत चारवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. लॅबुशेनने जडेजाविरुद्ध 175 चेंडूत 76 धावा केल्या आहेत. त्यापैकी 138 चेंडू डॉट गेले आहेत. यादरम्यान, लॅबुशेनची सरासरी 15.2 आणि स्ट्राइक-रेट 43.4 राहिला आहे. सध्याच्या मालिकेत लबुशेनने जडेजाविरुद्ध 125 चेंडूत केवळ 46 धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदीनेही कसोटीत 5 वेळा लॅबुशेनला बाद केले आहे.

Back to top button