Harmanpreet Kaur : मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे सोपवली जबाबदारी

Harmanpreet Kaur : मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे सोपवली जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिची महिला प्रीमियर लीग (WPL)साठी मुंबई इंडियन्स (MI) संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. डब्ल्यूपीएल लिलावात मुंबईने हरमनप्रीतला तब्बल 1.80 कोटी रुपयांना विकत घेऊन आपल्या संघात सामील करून घेतले होते.

'आमचाच संघ जिंकणार'

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या सर्वेसर्वा नीता अंबानी म्हणाल्या की, हरमनप्रीतला (Harmanpreet Kaur) आमच्या संघाची कर्णधार बनवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना हरमनप्रीतने संघाला अनेक रोमांचक विजय मिळवून दिले आहेत. मला खात्री आहे की शार्लोट आणि झुलन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सचा संघ चमकदार कामगिरी करून डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावेल.'

हरमनप्रीतची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द (Harmanpreet Kaur)

हरमनप्रीत 2009 पासून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ती भारतीय संघाची कर्णधारही आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने तिच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीत धडक मारली होती. उजव्या हाताची आक्रमक फलंदाज असणा-या हरमनप्रीतने भारतासाठी आतापर्यंत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने 28.05 च्या सरासरीने 3,058 धावा केल्या असून यात 10 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे. 103 ही हरमनप्रीतची सर्वोच्च धावसंख्या आहेत. यासह हरमनने भारतासाठी आतापर्यंत 124 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात तिने 38.18 च्या सरासरीने आणि 73.13 च्या स्ट्राइक रेटने 3,322 धावा फटकावल्या आहेत.

स्ट्रार खेळाडूंचा भरणा

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या महिला संघात कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त, अमनजोत कौर(50 लाख), पूजा वस्त्राकर (1.90 कोटी), आणि यास्तिका भाटिया (1.50 कोटी) सारख्या महत्त्वाच्या भारतीय खेळाडू आहेत. याशिवाय नताली स्कायव्हर (3.2 कोटी रु.), हेली मॅथ्यूज (40 लाख) आणि अमेलिया केर (1 कोटी) या विदेशी स्टार्स असतील.

एमआयमधील इतर खेळाडू

क्लो ट्रायोन (30 लाख), हीथर ग्राहम (30 लाख), इसाबेल वोंग (30 लाख), प्रियंका बाला (20 लाख), धारा गुर्जर (10 लाख), हुमैरा काजी (10 लाख), जिंतिमनी कलिता (10 लाख), नीलम बिष्ट (10 लाख), सायका इशाक (10 लाख), सोनम यादव (10 लाख).

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 4 मार्च रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर हा थरार रंगणार आहे. यानंतर, हरमनचा आपला दुसरा सामना 6 मार्च रोजी स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबी विरुद्ध खेळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news