Sania Mirza : सानिया मिर्झाची विराट कोहलीच्या RCB संघात एन्ट्री, मिळाली ‘ही’ जबाबदारी | पुढारी

Sania Mirza : सानिया मिर्झाची विराट कोहलीच्या RCB संघात एन्ट्री, मिळाली ‘ही’ जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sania Mirza RCB Mentor : भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा ग्रँडस्लॅममधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. ती क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सानिया रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी (RCB) काम करणार आहे. लवकरच आयपीएलच्या धर्तीवर वुमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंट सुरू होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये आरसीबीची महिला टीम सुद्धा आहे. सानिया आरसीबीच्या महिला टीमची मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. आरसीबीने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन ही माहिती दिलीय.

बीसीसीआय पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन करत आहे. 4 मार्चपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आरसीबीने महिला संघासाठी सानिया मिर्झाची मेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. सानिया तिच्या या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. महिला लीगमध्ये एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण 87 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यामध्ये 30 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आरसीबीने स्मृती मंधानाला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. तसेच ती लीगमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली.

टीम बाँडिंग महत्त्वाचे

आरसीबीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सानिया मिर्झाशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सानियाने सांगितले की, ती तिच्या नवीन भूमिकेबद्दल खूप उत्साहित आणि रोमांचित आहे. ती म्हणाली, मी जवळपास 20 वर्षे व्यावसायिक टेनिसशी संलग्न आहे. आता निवृत्तीनंतरही मला खेळात योगदान द्यायचे आहे. कोणत्याही खेळात संघ बांधणी आवश्यक असते. मला आरसीबीच्या खेळाडूंसोबत सुरुवात करायची आहे. गेल्या 20 वर्षात मी जे काही शिकले ते मला इतर खेळाडूंसोबत शेअर करायला नक्कीच आवडेल,’ अशी भावना व्यक्त केली.

Back to top button