Rohit Sharma Rankings : रोहितसाठी शतक ठरले ‘संजीवनी’, टॉप-10 मधून बाहेर पडण्याचा धोका टळला | पुढारी

Rohit Sharma Rankings : रोहितसाठी शतक ठरले ‘संजीवनी’, टॉप-10 मधून बाहेर पडण्याचा धोका टळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Rankings : नागपूर कसोटीत ठोकलेले शतक टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी एकप्रकारे संजीवनी ठरले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याने दोन स्थानांची झेप घेत आठवे स्थान गाठले आहे. यापूर्वी ‘हिटमॅन’ कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 10व्या क्रमांकावर होता. कांगारूंविरुद्धच्या फटकावलेल्या 120 धावांच्या जोरावर रोहितचे सध्या 786 रेटिंग झाले आहे.

दुसरीकडे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (789) क्रिकेटपासून दूर असूनही रोहितच्या पुढे आहे. तो सातव्या क्रमांकावर कायम आहे. पण जर दिल्ली कसोतीत रोहितच्या बॅटमधून पुन्हा धावांचा पाऊस पडला तर तो नक्कीच पंतच्या मागे टाकू शकतो. (Rohit Sharma Rankings)

अव्वल स्थानावर मार्नस लॅबुशेनचे वर्चस्व

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान अजूनही मार्नस लॅबुशेनच्या ताब्यात आहे. त्याचे 921 रेटिंग आहे. तर स्टीव्ह स्मिथ (897) दुस-या क्रमांकावर कायम आहे. भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत हे दोन्ही फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 862 आहे. ट्रॅव्हिस हेड (833) चौथ्या, तर जो रूट पाचव्या (826) स्थानी आहे. टॉप पाचमध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.

रोहितचे संस्मरणीय शतक (Rohit Sharma Rankings)

रोहितच्या कसोटीतील शतकाची चाहते अतुरतेने वाट पाहत होते. अशातच नागपूर कसोटीत संघ अडचणीत असताना रोहितने खेळीचे प्रदर्शन केले आणि संस्मरणीय शतक झळकावले. कर्णधार पदाची धुरा सांभाळताना केलेल्या या शतकी खेळीवर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला. अवघड खेळपट्टीवर 212 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने 15 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 120 धावा केल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रोहितने यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये शतक झळकावले होते.

कोहली आणि अय्यर जैसे थे

रोहितच्या क्रमवारीत सुधारणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा (732) दहाव्या तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने (748) नवव्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 16 व्या स्थानावर आहे. त्याचे 665 रेटिंग आहे. नागपुरात कोहलीने निराशा केली. त्याला 26 चेंडूंत दोन चौकारांसह केवळ 12 धावा करता आल्या. श्रेयस अय्यर (659) 17व्या क्रमांकावर आहे. दुखापतीमुळे तो नागपूर कसोटी खेळू शकला नव्हता. श्रेयस आता पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. शुक्रवारपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या कसोटीसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

 

Back to top button