पुढारी ऑनलाईन डेस्क : T20WC : भारतीय महिला क्रिकेट संघ बुधवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणा-या या सामन्याआधीच स्पर्धेत 'भूकंप' झाल्याचे समोर आले आहे. स्पॉट फिक्सिंग हे या भूकंपाचे कारण बनले आहे.
यात बांगलादेश संघाचा भाग असणारी अष्टपैलू खेळाडू लता मंडल स्पॉट फिक्सिंगमुळे चर्चेत आली आहे. खुद्द लताने याबाबत तक्रार केली असून बांगलादेशची वरिष्ठ खेळाडू शोहेली अख्तरवर तिने स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. दोघांमधील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (T20WC)
14 फेब्रुवारी रोजी झालेल्या बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर ही बाब समोर आली. हा सामना बांगलादेशने गमावला. मात्र, या सामन्यात लता प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हती. बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशमध्ये असलेल्या शोहेलीने लताला स्पॉट फिक्सिंगसाठी लाखो रुपयांची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. (T20WC)
शोहेलीने ऑडिओ क्लिपमध्ये म्हणते की, 'मी कशाचीही जबरदस्ती करत नाहीये. तुला इच्छा असेल तर तू खेळू शकतेस. तू यावेळीही करू शकतेस. आता तू निवड तुला कोणत्या सामन्यात करायचे आहे. तू मला सामन्याबद्दल सांगू शकतेस. तुझ्या इच्छेनुसार आहे. घाबरण्यासारखे काही नाही. तुझे कोणतेही नुकसान होणार नाही.'
मात्र, लताने शोहेलीची ऑफर नाकारली. तिने उत्तर दिले की, मी या सर्व गोष्टींमध्ये सहभागी नाही. कृपा करून मला या गोष्टी सांगू नकोस. मी असे कृत्य कधीच करू शकणार नाही.'
दरम्यान, हे प्रकरण समोर येताच बीसीबीचे मुख्य कार्यकारी निजामुद्दीन चौधरी यांनी आयसीसी या प्रकरणाची चौकशी करेल असे स्पष्ट केले आहे. चौधरी म्हणाले, "आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी युनिट अशा प्रकरणांची चौकशी करते. आमच्या खेळाडूंना माहित आहे की त्यांनी काय करावे आणि काय करू नये. जर कोणाशी संपर्क साधला असेल, तर त्यांनी इव्हेंट प्रोटोकॉलनुसार आयसीसी एसीयुला माहिती देणे आवश्यक आहे. हा बीसीबीच्या तपासाचा विषय नाही.