पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर कसोटीत आर. अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या फिरकी जोडीची जादू पहायला मिळाली. दोघांनी मिळून सामन्यात एकूण 15 विकेट घेतल्या. या कामगिरीचा दोघांना जबरदस्त फायदा झाला आहे अश्विनने 846 रेटिंगसह गोलंदाजी क्रमवारीत चौथ्यावरून दुसरे स्थान मिळवले आहे. 2017 नंतर प्रथमच त्याने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आगेकुच केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (867) पहिल्या स्थानी कायम आहे.
जडेजानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास पाच महिने क्रिकेटपासून दूर असलेला हा डावखुरा फिरकी गोलंदाज 16व्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फिरकीपटू गुडाकेश मोतीने कसोटी क्रिकेटमध्ये धमाल केली आहे. आतापर्यंत फक्त 3 कसोटी सामने खेळलेल्या मोतीने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटीत 19 बळी मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी क्रमवारीत 77 स्थानांची सुधारणा करून 46व्या स्थानी झेप घेतली आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. तर अश्विन दुसऱ्या आणि अक्षर पटेल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.