ICC Rankings : रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रचला इतिहास, तिन्ही फॉरमॅटमध्ये संघ अव्वल | पुढारी

ICC Rankings : रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रचला इतिहास, तिन्ही फॉरमॅटमध्ये संघ अव्वल

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आयसीसीने बुधवारी क्रमवारी अपडेट केली. नागपूर कसोटीत कांगारूंविरुद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयाचा फायदा रोहित ब्रिगेडला झाला. याचबरोबर भारतीय संघ कसोटीतही नंबर वन बनला.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती. तर ऑस्ट्रेलियन संघ 126 रेटींगसह पहिल्या क्रमांकावर होता. पण नागपूर कसोटीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांची 111 रेटींगस दुस-या स्थानी घसरण झाली आहे.

दुसरीकडे पहिली कसोटी जिंकून भारतीय संघाने सलग दुस-यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी झेप घेतली आहे. कांगारूंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकण्यात यश मिळवले तर टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

टीम इंडिया चौथ्यांदा अव्वल

टीम इंडिया 1973 मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर संघाला पुन्हा अव्वल स्थान मिळविण्यासाठी तब्बल 36 वर्षे वाट पाहावी लागली. 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर वन बनली. त्यानंतर 2011 पर्यंत भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आपला दबदबा राखला.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 2016 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. एप्रिल 2020 पर्यंत हे स्थान कायम ठेवण्यात संघाला यश आले. त्यानंतर टीम इंडियाच्या क्रमवारीत घसरण झाली, पण संघ नेहमीच टॉप-3 मध्ये राहिला. आता पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर वन बनली आहे.

कसोटीत इंग्लंड तिसऱ्या स्थानी

कसोटीत इंग्लंड 106 रेटिंग गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या, वेस्ट इंडिज सहाव्या, पाकिस्तान सातव्या, श्रीलंका आठव्या, बांगलादेश नवव्या, झिम्बाब्वे दहाव्या क्रमांकावर आहे. वनडे क्रमवारीत भारत अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर टी-20 क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर कायम असून इंग्लंड आणि पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Back to top button