Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराला झटका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘या’ संघातून वगळले | पुढारी

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराला झटका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘या’ संघातून वगळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) मोठा झटका बसला आहे. 9 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका जून 2023 मध्ये होणार्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण या मालिकेपूर्वी संघ व्यवस्थापनाने चेतेश्वर पुजाराच्या संदर्भात मोठा निर्णय घेत त्याला संघातून वगळले आहे.

वास्तविक, पुजारा आगामी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) टीम इंडियाचा एक भाग आहे. तो सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहे. या स्पर्धेच्या 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू सामन्यातून पुजारा बाहेर पडला आहे. तो या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

वर्कलोड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी कसोटी मालिका (IND vs AUS) लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्याही आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेपूर्वी पुजारा (Cheteshwar Pujara) अनेकदा रणजीमध्ये उतरून आपली तयारी मजबूत करतो, पण यावेळी संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय संघाची भिंतही म्हटले जाते. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराने 44.39 च्या सरासरीने 7014 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 34 अर्धशतके आणि 19 शतके झळकावली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश दौऱ्यावर त्याने भारतीय संघासाठी शानदार शतक फटकावले. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीही त्याच्या या खेळीने खूप खूश होता. पुजाराच्या शतकादरम्यान त्याने डान्स करून सेलिब्रेशन केले होते.

भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Back to top button