Shubman Gill New Record : सर्वाधिक धावा करण्याच्या ‘या’ प्रकारात शुबमन गिल सुसाट, विराट कोहली पडला मागे | पुढारी

Shubman Gill New Record : सर्वाधिक धावा करण्याच्या ‘या’ प्रकारात शुबमन गिल सुसाट, विराट कोहली पडला मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill New Record : शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने दुसरे स्फोटक शतक झळकावले. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात गिलने धडाकेबाज फटकेबाजी करत 72 चेंडूत 100 धावांचा आकडा पार केला. याआधी त्याने मालिकेतील पहिल्याच सामन्यात विक्रमी द्विशतक झळकावले होते. इंदूरमध्ये शतक झळकावून त्याने यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात सलामीवीर म्हणून आपल्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

गिलने 78 चेंडूत 112 धावा केल्या. वेगवान फलंदाजी करताना त्याने या डावात 13 चौकारांसह पाच षटकारही ठोकले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. विशेष म्हणजे या मालिकेत त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोनवेळा तीन आकडी धावसंख्या गाठण्याचा पराक्रम केला आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात सलामीवीर म्हणून खेळण्याचा त्याचा दावाही यामुळे पूर्ण झाला आहे. कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार म्हणून गिलचे विश्वचषकात खेळणे आता निश्चित मानले जात आहे. इंदूरमध्ये शतक झळकावल्यानंतर तो या शर्यतीत इशान किशन, केएल राहुल आणि शिखर धवन यांना बरेच मागे टाकून पुढे गेला आहे. (Shubman Gill New Record)

गिलने विराट कोहलीला मागे टाकले

शुभमन गिलने या वनडे मालिकेत एकूण 360 धावा करून तीन सामन्यांच्या एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. वर्ष 2016 मध्ये, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक 360 धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या शतकी खेळीच्या जोरावर गिल तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. याआधी सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता पण तोही 300 चा आकडा गाठू शकला नाही. (Shubman Gill New Record)

Back to top button