Rohit Sharma Century : रोहित शर्माचे 1101 दिवसांनी वनडे शतक! हिटमॅनने मोडले ‘हे’ विक्रम | पुढारी

Rohit Sharma Century : रोहित शर्माचे 1101 दिवसांनी वनडे शतक! हिटमॅनने मोडले ‘हे’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Century IND vs NZ 3rd Odi : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वन-डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. इदौरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत हिटमॅनने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने तब्बल 1101 दिवसांनंतर वनडेत शतकी खेळी साकारली असून त्याने मोठे विक्रमही मोडीत काढले आहेत.

रोहितचे झटपट शतक (Rohit Sharma Century)

रोहित शर्माला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू लागले. या खेळाडूने आपल्या शानदार खेळीत एकूण 9 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहितचे हे शतक 2020 नंतर आले. त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे वनडे शतक झळकावले होते. रोहितशिवाय शुभमन गिलनेही या सामन्यात आपले शतक पूर्ण केले.

पाँटिंगची बरोबरी

रोहितने या शतकासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित आता रिकी पाँटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावावर आता 30 वनडे शतके आहेत. त्याच्या पुढे विराट कोहली (46) आणि सचिन तेंडुलकर (49) आहेत. (Rohit Sharma Century)

‘हा’ विक्रमही मोडीत

याशिवाय रोहितने आणखी एक मोठा विक्रम मोडला. त्याने षटकारांचा नवा विक्रम रचला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हिटमॅन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला (270 षटकार) मागे टाकले. रोहितच्या खात्यात आता 272 षटकार जमा झाले आहेत.

Back to top button