

पुढारी ऑनलाईन डेस्क : Smriti Mandhana : स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी (22 जानेवारी) पूर्व लंडनच्या बफेलो पार्क येथे खेळल्या गेलेल्या टी-20 तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव केला. भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. मानधना तिच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 2 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून 111 धावाच करू शकला. भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकात 33 धावांची भागीदारी केली. यास्तिका 23 चेंडूत 18 धावा करून बाद झाली.
यास्तिकानंतर क्रीझवर आलेली हरलीन देओलही मोठी खेळी खेळू शकली नाही. नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ती शनिका ब्रूसची शिकार ठरली. हरलीनने 11 चेंडूत 12 धावा केल्या. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीझवर आली. त्यानंतर तिनी स्मृती मानधनासोबत आघाडी घेतली. दोघींनी मिळून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली.
मानधनाने टी-20 मधील तिचे 20 वे अर्धशतक झळकावले. त्याचवेळी हरमनप्रीत कौरने शेवटच्या षटकात कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीत आणि स्मृती यांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 चेंडूत नाबाद 115 धावांची भागीदारी केली. अखेरच्या 10 षटकांत या जोडीने 107 धावा कुटल्या. स्मृती 51 चेंडूत 74 धावा करून नाबाद राहिली. तिने 10 चौकार, एक षटकार ठोकला. या खेळीदरम्यान स्मृतीचा स्ट्राइक रेट 145.10 होता. हरमनप्रीतने 35 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. तिने आठ चौकार मारले. हरमनप्रीतचा स्ट्राईक रेट 160 होता.
स्मृती मानधनाने तिच्या वादळी खेळीदरम्यान 6000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आणि हा आकडा गाठणारी भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरनंतर हा आकडा गाठणारी ती भारतातील तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मंधानाने कसोटीत 325 धावा, एकदिवसीय सामन्यात 3073 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2603 धावा केल्या आहेत.
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, विंडिजची सुरुवात खराब आणि संथ झाली. त्यांचे फलंदाज संघाचा डाव सावरण्यात शेवटपर्यंत अपयशी ठरले. विंडिजच्या 3 विकेट अवघ्या 25 धावांत पडल्या होत्या. त्यानंतर शेमेन कॅम्पबेले आणि कर्णधार हेली मॅथ्यूज यांनी कसाबसा डाव भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करत धावफलक हलता ठेवला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. कॅम्पबेलने 47 आणि मॅथ्यूजने नाबाद 34 धावा केल्या. पण कॅरेबियन संघाला 4 विकेटच्या मोबदल्यात केवळ 111 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने सामना सहज खिशात घातला.
महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर आहे. किवी संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाची सुरुवात करताना बेट्सने 3402 धावा केल्या आहेत. या बाबतीत इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लिश संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सलामी देताना तिने 2570 धावा केल्या. त्याचबरोबर भारताची स्मृती मानधना आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मंधानाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून आतापर्यंत 2525 धावा केल्या आहेत.
स्मृती मानधनाने भारतासाठी 109 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 109 सामन्यांपैकी 105 डावात फलंदाजी करताना तिने 2646 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये तिच्या नावावर 20 अर्धशतकांची नोंद झाली आहे. स्मृतीची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 86 धावा आहे. तिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 20 अर्धशतके झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत ती सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारी दुसरी महिला सलामीवीर ठरू शकते. शार्लोट एडवर्डसला मागे सोडण्यासाठी तिला फक्त 46 धावांची गरज आहे. मानधना ही 20 अर्धशतके पूर्ण करणारी जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत फक्त सुझी बेट्स (24) आणि स्टेफनी टेलर (21) तिच्या पुढे आहेत.