Rohit Sharma Record : ‘हिटमॅन’ रोहितचे अनोखे रेकॉर्ड! ‘अशा’ दोन ‘फिफ्टी’ करणारा जगातील पहिला फलंदाज | पुढारी

Rohit Sharma Record : ‘हिटमॅन’ रोहितचे अनोखे रेकॉर्ड! ‘अशा’ दोन ‘फिफ्टी’ करणारा जगातील पहिला फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 2023 वर्षाची धमाकेदार सुरुवात केली. गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज विक्रमी खेळी केली. ‘हिटमॅन’ने अवघ्या 67 चेंडूत 83 धावा तडकावल्या. याचबरोबर त्याने एका अनोख्या व्रिकामाला गवसणी घातली.

रोहित फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याला बरेच काही सिद्ध करायचे होते. वैयक्तिक फॉर्मपासून ते फिटनेसपर्यंत, त्याने गुवाहाटीच्या बारसाबारा स्टेडियमच्या खेळपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वन डे सामन्यात त्याने ज्या पद्धतीने सुरुवात केली ती रोहितच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली. भारतीय कर्णधाराने आपल्या नेहमीच्या शैलीत डावाची सुरुवात केली. त्याने पहिल्याच षटकापासून गोलंदाजांवर आक्रमण केले आणि वेगाने अर्धशतक झळकावून एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

रोहितने श्रीलंकेविरुद्ध 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान हिटमॅनने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. म्हणजेच 50 चा आकडा गाठण्यासाठी त्याने चौकार आणि षटकारांसह 80 टक्के धावसंख्या पूर्ण केली. ही रोहितची सुप्रसिद्ध शैली आहे आणि त्याची भारतीय संघासाठी खेळण्याची ही शैली एका मोठ्या बातमीपेक्षा कमी नाही. रोहितने 67 चेंडूत एकूण 9 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावा केल्या. वनडेमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मधुशंकाने त्याची विकेट घेतली.

रोहितचा अनोखा विक्रम

हिटमॅन रोहितने या सामन्यात वन डे सामन्यांच्या सलग दोन डावांमध्ये अर्धशतक झळकावून हा उंबरठा ओलांडला. पण विशेष म्हणजे त्याने वेगवेगळ्या बॅटिंग पोझिशनवर खेळताना ही दोन्ही अर्धशतक झळकावली. हिटमॅनने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय डावात दुखापतग्रस्त हाताने एक संस्मरणीय खेळी साकारली होती. या मात्र त्या सामन्यात टीम इंडियाला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण रोहितच्या तडफदार खेळीने भारतीय चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. 9व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भारतीय कर्णधाराने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याने 28 चेंडूत केलेल्या 51 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले. रोहितने लंकेविरुद्धच्या पुढील एकदिवसीय सामन्यात पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक केले. यासह रोहित 9 व्या आणि पहिल्या क्रमांकावर खेळत सलग दोन डावात अर्धशतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Back to top button