Virat Kohli New Record : विराट कोहलीचे नवे रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरच्या ‘या’ महाविक्रमाशी केली बरोबरी | पुढारी

Virat Kohli New Record : विराट कोहलीचे नवे रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरच्या ‘या’ महाविक्रमाशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli New Record : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे तर एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक ठोकले. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने 80 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

याचबरोबर रन मशिन विराटने पुन्हा एकदा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. या शतकासह विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. कोहली आता श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्धचे 9वे शतक आहे. त्याने सचिन तेंडुलकरला (8 शतके) मागे टाकले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

48 वन डे सामन्यांमध्ये 9 शतके : विराट कोहली
84 वन डे सामन्यांमध्ये 8 शतके : सचिन तेंडुलकर
89 वन डे सामन्यांमध्ये 7 शतके : सनथ जयसूर्या
37 वन डे सामन्यांमध्ये 6 शतके : गौतम गंभीर
46 वन डे सामन्यांमध्ये 6 शतके : रोहित शर्मा
76 वन डे सामन्यांमध्ये 6 शतके : कुमार संगकारा

याशिवाय विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कोहलीने घरच्या मैदानावर 20 वे वनडे शतक झळकावले. त्याने 164 सामन्यात 20 एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. विराटने 102 व्या सामन्यात 20 वन डे शतके पूर्ण केली. कोहलीने घरच्या भूमीवर शेवटचे शतक मार्च 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते.

मायदेशातील मैदानांवर सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू

164 वन डे सामन्यात 20 शतके : सचिन तेंडुलकर
102 वन डे सामन्यात 20 शतके : विराट कोहली*
69 वन डे सामन्यात 14 शतके : हाशिम आमला
153 वन डे सामन्यात 13 शतके : रिकी पाँटिंग
110 सामन्यात 12 शतके : रॉस टेलर

गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत विराटने वन डे क्रिकेटमधील शतकाचा चार वर्षांचा दुष्काळ संपवला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 91 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती.

सचिन आणि विराटनंतर हाशिम आमला हा घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके फटकावणारा खेळाडू आहे. त्याने 69 वन डे सामन्यांमध्ये 14 शतके झळकावली आहेत. या यादीत रिकी पाँटिंग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 153 वन डे सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर 13 शतके झळकावली आहेत. तर रॉस टेलरने घरच्या मैदानावर 110 वन डे सामन्यांत 12 शतके झळकावली आहेत.

विराट धोनीलाही टाकणार मागे…

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 169 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्वांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली 2333 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर माजी कर्णधार एमएस धोनी 2383 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत विराट कोहलीचा फॉर्म पाहता तो कॅप्टन कोहलला मागे टाकून श्रीलंकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल. या यादीत सचिन तेंडुलकर 3113 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

एवढेच नाही तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेतील शतकांच्या बाबतीत विराटने सचिनला मागे टाकले आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध नऊ शतकांसह 2333 धावा केल्या आहेत. या यादीत आता सचिन तेंडुलकर दुस-यास्थानी पोहचला आहे. त्याने 84 सामन्यात 8 शतकांसह 3113 धावा केल्या आहेत.

Back to top button