Ishan Kishan : टीम इंडियातून डच्चू मिळूनही ईशानने रचला इतिहास, बनला जगातील पहिला खेळाडू | पुढारी

Ishan Kishan : टीम इंडियातून डच्चू मिळूनही ईशानने रचला इतिहास, बनला जगातील पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेकॉर्ड ब्रेक द्विशतक झळकावूनही इशान किशनला (Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे साठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून स्थान मिळाले नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला वगळून शुबमन गिलला संधी दिली. या निर्णयामुळे चाहत्यांसह माजी दिग्गज खेळाडू चांगलेच भडकले आहेत.

इशान किशनने (Ishan Kishan) नुकत्याच झालेल्या बांगला देशविरुद्धच्या तिस-या वन डे सामन्यात द्विशतक फटकावले होते. पण असे असूनही कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी स्पष्ट केले होते की शुभमन गिल त्याच्यासोबत सलामीसाठी मैदानात उतरेल, परंतु इशान किशनला संघात स्थान दिले जाणार नाही. रोहितने सामन्यापूर्वी टॉसदरम्यानही अशाच काही गोष्टी सांगितल्या. आता इशान किशन हा जगातील पहिला फलंदाज बनला आहे, जो दुहेरी शतक झळकावूनही त्याच फॉरमॅटच्या पुढील सामन्यात बाहेर बसला आहे.

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्याची 10 तारीख होती, जेव्हा बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वन डे सामन्यात इशानने द्विशतक झळकावले. आता बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच 10 जानेवारीला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. त्या सामन्यात ईशान किशन शिखर धवनसोबत ओपनिंगसाठी मैदानात आला होता. त्याने धडाकेबाज फलंदाजी करून पहिला अर्धशतक आणि त्यानंतर शतक पूर्ण केले. यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने दीडशेचा टप्पा पार केला. आता तो आपले पहिले द्विशतकही पूर्ण करेल अशी अपेक्षा होती आणि तसे झाले. त्याने 200 धावांचा आकडा सहज गाठला. बाद होण्यापूर्वी इशानने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 षटकार आणि 24 चौकार आले.

इशानच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आठ विकेट्सवर 409 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेश संघ मैदानात उतरला. पण त्यांचा संपूर्ण संघ केवळ 182 धावांतच गारद झाला आणि भारताने सामना तब्बल 227 धावांनी जिंकला.

इशान किशनने ब्रेड हॉगचा विक्रम मोडला (Ishan Kishan)

वन डेमध्ये दुहेरी शतक झळकावल्यानंतर याच फॉरमॅटच्या पुढील सामन्यातून डच्चू मिळवणारा इशान किशन हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉगच्या नावावर होता. ब्रॅड हॉगने शतक (123) झळकावले होते. पण यानंतरही त्याला वन डे सामन्यातून वगळून त्याच्या जागी अँड्र्यू सायमंड्सला स्थान देण्यात आले होते.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील आणखी दोन सामने शिल्लक आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये इशानला स्थान मिळणार की नाही, हे पाहावे लागेल.

Back to top button