

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यासाठी इशान किशनच्या (Ishan Kishan) जागी शुबमन गिलला (shubman gill) सलामीवीर म्हणून निवडले. यामुळे भारताचे माजी प्रशिक्षक आणि वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (venkatesh prasad) संतप्त झाले. ईशानने बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक द्विशतक झळकावूनही त्याला रोहितने प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. या निर्णयामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनीही या वादात उडी घेत भारतीय कर्णधाराला धारेवर धरले.
व्यंकटेश प्रसाद (venkatesh prasad) यांनी ट्विटरवर अनेक पोस्ट टाकत रोहितच्या निर्णयावर टीका केली आहे. अशा वारंवार होणाऱ्या बदलांमुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताच्या कामगिरीवर कसा परिणाम झाला हे त्यांनी स्पष्ट केले. रोहितने सोमवारी खुलासा केला होता की, केवळ शुबमन गिल त्याच्यासोबत ओपनिंग करेल. व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, विचार करा की भारताच्या शेवटच्या वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूला संधी न देणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
व्यंकटेश यांनी म्हटलंय की, शुबमन गिलसाठी खूप वेळ आहे, परंतु द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूला तुम्ही सोडू शकत नाही. जर कोणाचा गिलवर इतका विश्वास असेल तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू द्या आणि केएल राहुलच्या जागी ईशानला (Ishan Kishan) यष्टिरक्षक म्हणून ठेवा. पण दुर्दैवाने इशानला (Ishan Kishan) बाहेर बसावे लागले आहे. चमकदार कामगिरी करणारा आणि एक्स फॅक्टर ठरलेल्या खेळाडूला वगळले जाते आणि जेमतेम प्रदर्शन करणा-या खेळाडूंना कायम ठेवले जाते, हे चुकीचे आहे. संघात होत असलेल्या बदलाचा परिणाम टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या प्रदर्शनावर होत आहे,' असे परखड मत त्यांनी मांडले.
व्यंकटेश पुढे म्हणतात, इंग्लंडमध्ये पंतने शतक झळकावले होते आणि भारताला वन डे मालिका जिंकण्यास मदत केली होती. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मच्या आधारे त्याला वन डे संघातून वगळण्यात आले. दुसरीकडे केएल राहुल काही डाव वगळता सातत्याने अपयशी ठरला असला तरी त्याने आपले स्थान कायम ठेवले आहे. प्रदर्शन हे सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर नाही. हे वाईट आहे,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
'दोन्ही सलामीवीरांनी (गिल आणि किशन) खरोखरच चांगली कामगिरी केली आहे, परंतु आम्ही गिलला धावा करण्याची संधी देणे योग्य ठरेल. गिलने 2014 मध्ये खूप धावा केल्या होत्या. मागील काही सामन्यांत ईशानने संघासाठी आश्वासक फलंदाजी केली आहे. त्याने द्विशतक झळकावले आहे. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी किती धैर्य लागते. ही एक मोठी उपलब्धी आहे, परंतु मी फक्त प्रामाणिक आणि निष्पक्ष आहे. ज्यांनी भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे त्यांना पुरेशी संधी दिली पाहिजे,' असे मत रोहितने मांडले होते.