Pele Funeral : पेलेंच्या अंत्यसंस्काराकडे ब्राझीलच्या दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ | पुढारी

Pele Funeral : पेलेंच्या अंत्यसंस्काराकडे ब्राझीलच्या दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉलचे जादूगार पेले यांनी ब्राझीलचे नाव जगभरात पोहचले. पण या महान फुटबॉलपटूच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराकडे ब्राझीलच्या दिग्गज फुटबॉलपटूंनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यामध्ये स्टार खेळाडू नेमार, माजी फुटबॉलपटू काका आणि विक्रमवीर रोनाल्डोचा समावेश आहे. (Pele Funeral)

ब्राझीलने मंगळवारी पेले यांना अंतिम निरोप दिला. त्यांच्या पार्थिवावर सँटोस शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी हजेरी लावली होती. त्यांनी विला बेल्मिरो स्टेडियमवर पेले यांचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. पेले यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश काळ याच स्टेडियमवर व्यतीत केला होता. (Pele Funeral)

अंतिम दर्शनानंतर पेले यांची शवपेटी व्हिला बेल्मिरो स्टेडियममधून दफनभूमीत नेताना अंत्ययात्रा काढण्यात आली. यादरम्यान बँडने संघाचे अधिकृत गीत आणि रोमन कॅथलिक गाणे वाजवले. तसेच उपस्थितांनी पेले यांना आवडणारी सांबा गाणीही गायली. मात्र, या अंत्ययात्रेत ब्राझीलचे काही आजी-माजी खेळाडूंनी अनुपस्थित राहिले. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्टेडियमजवळ बेकरी चालवणाऱ्या एका व्यक्तीने, ‘रोनाल्डो नाझारियो कुठे आहे? काका कुठे आहे, नेमार कुठे आहे?असे प्रश्व उपस्थित करून ‘त्या खेळाडूंना वाटतं आम्हाला पेलेसारखी त्यांची आठवण येईल का? या लोकांना त्यांची सुट्टी आनंदात घालवायची आहे. हे खेळाडू अंत्यसंस्कार विधीला उपस्थित नाहीत हे खटकते. असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

सतरा वर्षांची एक मुलगी पेलेंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तीन तास रांगेत उभी होती. तिच्यासोबत तिचे वडील होते, ज्यांनी पेलेचे नाव असलेला ब्राझिलियन टी-शर्ट परिधान केला होता. जिओव्हाना म्हणाली, ‘मी सँटोसची चाहती नाही आणि माझे वडीलही नाहीत. पण या माणसाने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला नवी ओळख दिली.’ यावेळी अंत्ययात्रेला उपस्थित लोकांनी पेलेंची 10 नंबरची पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून उपस्थिती दर्शवली.

पेलेंच्या अंत्यविधीला नेमार उपस्थित न राहण्याचे कारण…

पेलेंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याने नेमारवर टीका होत आहे. परंतु, नेमारला पेलेंच्या अंत्यविधीला उपस्थित राहायचे होते. पण, तो खेळत असलेला क्लब पी.एस.जी. ने त्याला ब्राझीलला जाण्यापासून रोखले. या मागे क्लबने कारण दिले की, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेला मेस्सी अजून सुट्टीवरून क्लबमध्ये दाखल झाला नाही आहे. त्यामुळे क्लबच्या पुढच्या फळीची जबाबदारी नेमार आणि एमबाप्पे यांच्यावर आहे. नेमार ब्राझीलला गेल्यास आक्रमक फळीचा ताण एमबाप्पेवर येऊ शकतो. त्यामुळे नेमारला ब्राझीलला जाण्यास क्लबने परवानगी दिली नाही. त्याच्या बदली नेमारच्या वडिलांनी पेले यांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली.

हेही वाचा;

Back to top button