पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) अल नासर क्लबमध्ये (al nassr club) दाखल झाला आहे. मंगळवारी तो त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्स आणि मुलांसह खासगी विमानाने सौदी अरेबियाला पोहोचला. यानंतर तो क्लब अल नासरच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाला. मात्र, माध्यमांशी संवाद साधताना रोनालडोची जीभ घसरली आणि त्याने एक मोठी चूक केली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून रोनाल्डोला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
रोनाल्डोने स्वत:चे एक 'युनिक खेळाडू' म्हणून वर्णन केले. आपली कारकीर्द संपलेली नाही, असाही इशार त्याने अप्रत्यक्षरित्या युरोप क्लब जगताला दिला. रोनाल्डो म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेत आल्याने माझे करिअर संपलेले नाही. इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. मी तिथले (युरोपमधील) सर्व विक्रम मोडले आणि आता मला इथल्या मैदानांवर नवे विक्रम बनवायचे आहेत.' खरेतर 37 वर्षीय फुटबॉलपटू त्या देशाचे नाव विसरला ज्याच्या क्लबने रोनाल्डोला अब्जावधी रुपये मोजून खरेदी केले. चुकून सौदी अरेबियाऐवजी दक्षिण आफ्रिकेचे नाव घेणे आता रोनाल्डोला चांगले महागात पडत आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून त्याला जोरदार ट्रोल येत आहे.
रोनाल्डो (ronaldo) पुढे म्हणाला, मी इथे जिंकण्यासाठी, खेळण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आलो आहे. या देशाच्या सांस्कृतिक यशाचा भागही मला बनायचे आहे. सौदी क्लबमध्ये सामील होण्यासाठी मी युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, अगदी पोर्तुगालमधील क्लबच्या मोठ्या ऑफर नाकारल्या. पण मला इथे यायचे होते. त्यामुळे मी सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबची निवड केली,' असे म्हणत त्याने आपली चूक सुधारली.
मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि युव्हेंटस येथे प्रभावी कामगिरी केल्यानंतर, रोनाल्डोने अल नासरसोबत करार केला. रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडच्या मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र, वादामुळे फिफा विश्वचषकापूर्वी त्याने करार मोडला. आता नव्या करारामुळे 1 हजार 775 कोटी त्याला क्लबकडून मिळणार आहेत. हा करार 2025 पर्यंत आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नासरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे पटकावली आहेत. या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल.