Shivam Mavi : ‘शिवम मावी’ने प्रदार्पणाच्या सामन्यात केला अनोखा विक्रम! | पुढारी

Shivam Mavi : ‘शिवम मावी’ने प्रदार्पणाच्या सामन्यात केला अनोखा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका (ind vs sl) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने आशियाई चॅम्पियन श्रीलंकेवर अवघ्या 2 धावांनी निसटता विजय मिळवला. गोलंदाज शिवम मावीने (Shivam Mavi) भारताकडून पदार्पण केले. त्याने आपल्या करीयरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

चार विकेट घेत विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पदार्पण करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या गोलंदाजाने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट मिळवल्या. या कामगिरीसह मवीने (Shivam Mavi) एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. टी20 पदार्पणाच्या सामन्यात 4 बळी घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. शिवम मावी व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी केली आहे. प्रग्यान ओझाने 2009 साली बांगलादेशविरुद्धच्या टी-20 पदार्पणाच्या सामन्यात 21 धावांत 4 बळी तर बरिंदर सरन याने 2016 साली टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करताना झिम्बाब्वेविरुद्ध 10 धावांत 4 बळी घेतले होते. आता सात वर्षांनंतर शिवम मावीने त्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

मावीचे प्रदार्पण अचानक…

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिवम मावी (Shivam Mavi) पदार्पण करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारले असता त्याने स्पष्टपणे सांगितले की अर्शदीप सिंग (arshdeep singh) आजारी आहे, त्यामुळे शिवम मावीला संधी देण्यात आली असून तो टीम इंडियासाठी पदार्पण करेल. याचा अर्थ अर्शदीप हाच सुरुवातीला टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, पण तो अनफिट असल्याने शिवम मावीला अचानक अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले. याच संधीचे मावीने सोने करत आपली क्षमता दाखवून दिली.

कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) स्वतः पहिले षटक टाकल्यानंतर त्याने दुसऱ्याच षटकात शिवम मावीला आक्रमणात आणले. तरे पाहता भारताकडे उमरान मलिकच्या (Umran Malik) रुपात दुसरा पर्याय उपलब्ध होता, पण कर्णधाराने मावीवर विश्वास दाखवला. त्यानंतर मावीने आपल्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन चौकार खाल्ले. यानंतर मावी दडपणाखाली येईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने श्रीलंकेचा सलामीवीर निसांकाला क्लिन बोल्ड करून तंबूत पाठवले. यानंतरचे चौथे षटक मावीने फेकले. या षटकातही त्याने दोन चौकार खाल्ले पण धनंजय डिसिल्वाला बाद करून त्याने आणखी एक यश मिळवले. सलग दोन षटकात दोन विकेट घेतल्यानंतर मावी स्टार झाला आणि सोशल मीडियावरही ट्रेंड करू लागला. यानंतरही मावी थांबला नाही. त्याने 14.3 व्या षटकात हसरंगा आणि 17.4 व्या षटकात महेश थेक्षाना यांना माघारी धाडून आणखी दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या.

Back to top button