Rishabh Pant : ऋषभनेच आपले नाव ‘गुगल’ करून दाखवले, ‘त्‍या’ तरूणांनी सांगितला प्रसंग | पुढारी

Rishabh Pant : ऋषभनेच आपले नाव 'गुगल' करून दाखवले, 'त्‍या' तरूणांनी सांगितला प्रसंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली होती. त्यांनीच जळत्या गाडीतून पंतचे सर्व सामान आणि पैसे बाहेर काढले होते. पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. रजत आणि निशू अशी या तरुणांची नावे आहेत. त्यांना ऋषभ पंतविषयी जास्त माहिती नसल्याने गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकले असल्याने शेवटी ॠषभनेच त्यांना गुगलवर आपले नाव सर्च करून दाखवले.

रजत आणि निशू साखर कारखान्यात काम करतात. आपण कामावर जात होतो तेव्हा पंतची (Rishabh Pant) गाडी दुभाजकावर आदळली अशी माहिती त्यांनी दिली आहे. आम्ही ऋषभ पंतचे नाव ऐकले होते, पण त्याला पाहिले नव्हते. इतका मोठा क्रिकेटर इतक्या पहाटे येथे कसा काय असेल असा विचार आम्ही केला. हरियाणा रोडवेजच्या चालकाने रुग्णवाहिकेला फोन केला होता. आम्ही पंतला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना रस्त्यात गुगलवर त्याच्याबद्दल सर्च केले. यावेळी पंतने आम्हाला नावाची स्पेलिंग योग्य टाका असे सांगितले. त्याने स्वतः आम्हाला योग्य स्पेलिंग टाकून दाखवले, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यानंतर त्याने आमचे आभार मानले आणि सोबत थांबण्यास सांगितले, पण नंतर पोलिसांनी आम्हा दोघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेत असताना आम्ही त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन केला होता, पण त्यांचा नंबर स्वीच ऑफ होता, असे त्यांनी सांगितले.

रजत आणि निशू यांनी सांगितले की, रुग्णवाहिका पंतला (Rishabh Pant) घेऊन सरकारी रुग्णालयात चालली होती; परंतु हा देशाचा खेळाडू असून लवकर उपचार मिळाले पाहिजे, असे रुग्णवाहिकेतील मदतनीसना आम्ही सांगत होतो. या तरुणांच्या सांगण्यावरून चालकाने पंतला सक्षम रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांनी पंतला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनीच नातेवाईकांना कळवले. रजत आणि निशू यांनी सांगितले की, आम्ही जळत्या कारजवळ पोहोचलो तेव्हा पंत स्वतः काच फोडून बाहेर आला होता आणि रस्त्यावरच झोपला होता. त्याने फार हिंमत दाखवली होती.

हेही वाचा : 

Back to top button