पुणे : 2023 मध्ये कोरोनाचा अंत; सहजीवन व्याख्यानमालेत डॉ. धनंजय केळकर यांचे भाकित | पुढारी

पुणे : 2023 मध्ये कोरोनाचा अंत; सहजीवन व्याख्यानमालेत डॉ. धनंजय केळकर यांचे भाकित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ’मूळ विषाणूपेक्षा म्युटेशनमधून तयार झालेले व्हेरियंट कमी ताकदीचे असतात. मात्र, जास्त काळ टिकण्यासाठी निर्माण होतात. त्यामुळे कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा बीएफ 7 व्हेरियंटचा प्रसार अधिक प्रमाणात होईल, पण संसर्गाची तीव्रता कमी असेल. आगामी 2023 हे वर्ष कोरोनाचा अंत असेल,’ असा आशावाद दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केला.

सहजीवन व्याख्यानमालेत डॉ. धनंजय केळकर ’लढा कोरोनाशी’ या विषयावर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये, नितीन पाटील आदी उपस्थित होते. ’चीनने मुद्दाम सोडलेला विषाणू नाही, हे जवळपास सिद्ध झाले आहे. त्यांनाही जगाइतकाच धक्का सहन करावा लागला. लॉकडाऊन आणि लसीकरणामुळे आपण कोरोनाशी प्रभावी लढा दिला’,

याकडेही डॉ. केळकर यांनी लक्ष वेधले. डॉ. केळकर म्हणाले, ’भारतात तीनही लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झाली. आपल्याकडील हर्ड इम्युनिटी संपण्याच्या पातळीवर आहे. लसीकरण हा एकमेव उपाय असल्याने, बुस्टर डोस लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. जानेवारी-फेब—ुवारीत चौथ्या डोसची घोषणा केली जाऊ शकते.’

शक्यतो हे कराच!
आजारी माणसाने मास्क जरूर वापरावा.
स्वतःच्या हिंमतीवर परदेश प्रवास करा किंवा शक्य असल्यास टाळा.
स्वतःच्या आरोग्यावर जास्त विश्वास ठेवा. व्यायाम, आहार हे दोन घटक अत्यंत आवश्यक आहेत. प्रतिकारशक्ती ही व्यायामाची फलनिष्पत्ती असते. कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती हे एकमेव प्रभावी हत्यार आहे.
व्हिटामिन डी, लसीकरण, व्यायाम आणि जलनेती या चतु:सूत्रीवर विश्वास ठेवा. जलनेतीमुळे श्वसनाच्या
आजारांवर नियंत्रण मिळवता येते.

 

Back to top button