New Year Resolution : नववर्षात स्ट्रेस आणि टेन्शन फ्री राहायचंय? दिनचर्येत करा ‘हे’ बदल

New Year Resolution : नववर्षात स्ट्रेस आणि टेन्शन फ्री राहायचंय? दिनचर्येत करा ‘हे’ बदल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सारी जीवनशैलीच बदलीय, सारच कंटाळवाणं झालंय, जगण्‍यातला स्‍ट्रेस खूपच वाढलाय…असा नकारात्‍मक सूर नेहमीच आपल्‍या कानावर पडत असतो. त्‍याचं कारणही तसेच आहे. सर्वच क्षेत्रातील तीव्र स्‍पर्धेमुळे जगण्‍याचा वेग एवढा वाढलाय की, लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच ताणतणावाला सामोरे जावे लागतय. २०२२ मधील भले बुरे सारं विसरुन आपण नव्‍या उमेदीने नववर्षात पदार्पण केले आहे. (New Year Resolution) आता नववर्षात आनंदी आणि स्‍ट्रेस फ्री जगायचा तुम्‍ही संकल्‍प करत असाल तर तुमच्‍या जीवनशैलीत काही सवयींचा समावेश करणे अनिवार्य आहे. जाणून घेऊया या सवयींविषयी…

१) New Year Resolution : हसतमुख जगा…

जेव्‍हा तुम्‍ही आनंद असता तेव्‍हा नकळत तुमच्‍या चेहऱ्यावर स्मित उमटतं. हसणं का महत्त्‍वाचे हे सर्वप्रथम जाणून घ्‍या. हसल्‍यामुळे तुमच्‍या शरीरात डोपामाईन संप्रेरकाला चालना मिळते. या संप्रेरकामुळे शरीराला नवं काही तरी करण्‍याची प्रेरणा मिळते. त्‍यामुळे रोजच्‍या जगण्‍याला तुम्‍ही हसतमुख सामोरे जा. छोट्या-छोट्या गोष्‍टीमधून आनंद घ्‍या. सर्वात महत्त्‍वाचे स्‍वत:च्‍या मनाची आणि आरोग्‍याची काळजी घ्‍या. यासाठी चागलं संगीत ऐका. एखादा छंद जोपासा. तुम्‍हाला तणाव वाटत असेल तर स्‍मितहास्‍य करुन तरी पाहा तुमच्‍या भावनांमध्‍ये काय बदल होतायत ते तपासा. तेव्‍हा स्‍मितहास्‍य करत दररोज नव्‍याने नव्‍या दिवसाची सुरुवात करा.

२) New Year Resolution : नियमित व्‍यायाम हवाच …

शरीर निरोगी राहण्‍यासाठी नियमित करावा, हे वाक्‍य ऐकून तुम्‍ही कंटाळला असाल. मात्र तेवढाच कंटाळा तुम्‍ही नियमित व्‍यायाम करण्‍यास करता हेही तेवढच खरे आहे. व्‍यायामाचे असंख्‍य शारीरिक लाभ होतात त्‍याचबरोबर मानसिक आरोग्‍य सुदृढ राहण्‍यासाठी त्‍याचे खूप मोठे फायदे आहेत, असे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. नियमित व्यायामामुळे तणाव, चिंतेची भावना आणि नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. यातूनच तुमचा जगण्‍याकडे पाहण्‍याचा सकारात्‍मक दृष्‍टीकोन तयार होतो. त्‍यामुळे तुम्‍हाला आवडणारी शारीरिक हालचालींचा समावेश रोजच्‍या दिनचर्येत करा.

३) विश्रांतीकडे दुर्लक्ष नको, शांत झोप आवश्‍यक

अतिरिक्‍त कामामुळे तुमचे विश्रांतीकडे नकळत दुर्लक्ष होते. मात्र, सातत्‍याने आपल्‍या दिनचर्येत विश्रांतीचा अभाव असेल तर शरीराला मोठी किंमत चुकवावी लागते. यासाठी रात्री किमान सात तासांची झोप आवश्यकता असते. पुरेशी झोप हे चांगले आरोग्य, मेंदूचे कार्य आणि भावनिक तंदुरुस्तीसाठी अत्‍यंत आवश्‍यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने हृदयविकार, नैराश्य आणि मधुमेह यांसारखे काही जुनाट आजार होण्याचा धोकाही कमी होतो. त्‍यामुळे शांत झोपेसाठी वेळ राखून ठेवा. तुम्हाला झोपेबाबत समस्या असतील तर तत्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. निद्रानाशवर उपचार घ्‍या. मात्र, शांत झोप हा निरोगी शरीराचा पाया आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

४)New Year Resolution : संतुलित आहार घ्‍या

तुमच्‍या आहाराचा शरीरावर परिणाम होतो तसा तो मनावरही होत असतो. त्‍यामुळे तुमचा आहार संतुलित ठेवा. आहारात साखर आणि स्‍टार्च असणारे पदार्थ कमी ठेवा. तर हिरव्‍या पालेभाज्‍या, कडधान्‍याचा आहारात समावेश करा. प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन संप्रेरक वाढतात त्‍यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. तसेच जास्त प्रक्रिया केलेले किंवा तळलेले पदार्थ टाळा. खाताना भूकेबरोबर मानसिक आरोग्‍यावर होणार्‍या परिणामाचाही विचार करा. तसेच जेवण्‍याच्या वेळा नियमित पाळा.

५) कृतज्ञता व्‍यक्‍त करा

तुम्‍ही तुमच्‍या दिवसाची सुरुवात ही कृतज्ञतेने करा. म्‍हणजे सर्वांचे आभार माना. या छोट्या सकारात्‍मक कृतीने तुमचे मूडवर लक्षणीय परिणाम होतो. तुमच्या आयुष्यातील घडलेल्‍या सकारात्‍मक गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करा. सर्वच बाबींबाबत आभार व्‍यक्‍त केल्‍याने तुमच्‍यातील सकारत्‍मकता वाढीला लागेल.

६) दीर्घ श्‍वसन करा

तुम्‍ही जेव्‍हा तणावात असता तेव्‍हा जाणवले असेल की तुमच्‍या शरीरावरही त्‍याचा परिणाम होतो. त्‍यामुळे जेव्‍हा तणावग्रस्‍त व्‍हाल तेव्‍हा दीर्घ श्‍वसन म्‍हणजे खोलवर श्‍वसन करा. दीर्घ श्‍वसन हा शरीरावरील तणाव कमी करण्‍यास मदत करतो, हे आजवर अनेक संशोधनात सिद्‍ध झाले आहे. जोपर्यंत तुम्‍हाला शांत वाटत नाही तोपर्यंत शांतपणे ही क्रिया करत राहा. जर तुम्हाला सावकाश, श्‍वासावर लक्ष केंद्रीत केल्‍यास त्रास होत असेल तर प्रत्येक श्‍वास घेताना आणि सोडताना अंक मोजा. यामुळे तणावग्रस्‍त परिस्‍थितीत तुम्‍ही शांत राहू शकता.

७) New Year Resolution : दुःखाची भावना स्वीकारा

जेव्‍हा तुम्‍ही दुःखी होता तर सर्वप्रथम ही भावना स्‍वीकारा. वाईट गोष्‍टी सर्वांबरोबरच घडत असातात. तो जगण्‍याचा एक भागच आहे. मात्र, जेव्‍हा तुम्‍ही दु:खी व्‍हाल आनंदी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करू नका. कारण कोणतीही कधीच नेहमी आनंदी राहू शकत नाही. त्‍यामुळे दु:खाचा क्षणही स्‍वीकारणे ही एक सकारात्‍मक सुरुवात असते. जेव्‍हा तुम्‍ही व्‍यथित व्‍हाल तर झालेली घटना स्‍वीकारा. खोल श्‍वास घ्‍या. कुठे तरी बाहेर फिरायला जा, दु:ख आपल्‍या जवळच्‍या व्‍यक्‍तीजवळ व्‍यक्‍त करा.

८) New Year Resolution : दररोज डायरी लिहा

दररोज डायरी लिहा. आपलं रोजचं जगणं हे तुम्‍ही रात्री झोपण्‍यापूर्वी लिहलं तर तुम्‍ही व्‍यक्‍त होता. यामुळे प्रामाणिकपणे तुम्‍ही डायरी लिहा. दररोज तुम्‍ही कोणत्‍या गोष्‍टीमुळे व्‍यथित झाला ते कशामुळे आनंदीत झाला? या प्रश्‍नांची उत्तरे डायरीत लिहा. कारण अनेक लहान गोष्‍टींना आपण कारण नसताना मोठे करत असतो. हे तुम्‍हाला मागील पाने वाचलं की लक्षात येते. मानसिक आरोग्‍य चांगलं राहण्‍यासाठी दिनचर्येत डायरी लिहण्‍याचा समावेश करा.

९) तणावाचा सामना करा

तणाव हा अपरिहार्य आहे. कधीच तणावमुक्‍त जगणं असत नाही, हे सर्वप्रथम स्‍वीकारा. कारण तणाव हा नेहमीच हानिकारक नसतो, हे आपण स्‍वीकारलं तर आपला तणावाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोनच बदलतो. मी तणाव टाळू शकत नाही. कारण प्रत्‍येकाला तणाव आहेच, हे प्रथम स्‍वीकारा. तणावग्रस्त परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करा. जितक्या लवकर तुम्ही तणवाचा सामना कराल तितक्या लवकर तुम्‍ही त्‍यावर नियंत्रण मिळविण्‍याचाही प्रयत्‍न कराल.

१० ) स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळा

लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आजच्‍या जगण्‍यात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तुम्‍ही सोशल मीडिया वापरत नाही तर हे माध्‍यमच तुमचा वापर करुन घेत आहे, याचे भान असूनही अनेक जण त्‍याच्‍या आहारी जातात. यातूनच आपली स्वतःची इतरांशी तुलना करण्‍याची स्‍पर्धा सुरु होते आणि नकळत आपण तणावाच्या पायरीवर जातो. यातूनच तुम्‍ही असमाधानी होता. नैराश्‍य तुम्‍हाला घेरते. त्‍यामुळे सर्वप्रथम स्वत:ची इतरांशी तुलना करणे थांबवण्याचा सराव सुरु करा.

१० ) New Year Resolution : मित्र-नातेवाईकांशी संवाद साधा

मानव हा सामाजिक प्राणी आहे, हे अनेक वेळा तुमच्‍या कानवर पडल्‍याने गुळगुळीत झालेले वाक्‍य असले तरी याचे महत्त्‍व मोठे आहे. कारण आजवरच्‍या अनेक संशोधनात मानाचा सामाजीकरणाचा टप्‍पा हा महत्त्‍वाचा मानला जातो. तुम्‍ही मित्र व नातेवाईकांशी संवाद साधा. संवादातून आनंद निर्माण होत असेल तर तो अधिक वृद्‍धींगत करण्‍याचा प्रयत्‍न करा.

११ ) आठवड्याचे नियोजन करा

आठवड्याचे नियोजन तुम्‍ही रविवारीच केले तर तुमच्‍या कामाचा ताण कमी होईल. नियोजन केले तर तुमचा तणाव कमी होतो, हे आजवरच्‍या अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. तुम्‍ही आठवड्याचे नियोजन करा. यामुळे कामाचा उरकही वाढतो आणि तुम्‍हाला तुमच्‍या छंदासाठी पुरेसा वेळही मिळतो.

१२ ) आठवड्यातून किमान एक तास फोनपासून लांब रहा

मोबाईल फोनचा अतिवापर हा आपल्‍या मेंदूमध्‍ये बदल होऊ शकतो तसेच तुमच्‍या मनःस्थितीवर याचा परिणाम होतो. मोबाईल फोनचा अतिवापर किशोरवयीन व तरुणांमध्‍ये अधिक गंभीर परिणाम होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे आठवड्यातून किमान एक तास मोबाईल फोन व सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्‍तू आठवड्यातून किमात १ तास दूर ठेवा. या वेळेत तुम्‍ही वाचन करा, ध्‍यान करा, शांतपणे आपल्‍या सभोवतालच्‍या वातावरणाकडे लक्ष द्‍या.

१३ ) काही वेळ निसर्गाच्‍या सानिध्‍यात जा

आठवड्यातून ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ हिरव्या जागांवर घालवल्याने रक्तदाब कमी होण्यास आणि नैराश्य येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते, असे संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. बाग, उद्यान, टेरेस गार्डन अशा पर्यावरणाच्‍या सानिध्‍यात रहा. तुम्‍ही निसर्ग आणि ताज्‍या हवेचा आनंद घ्‍या. निसर्ग तुम्‍हाला मानसिकदृष्‍ट्या अधिक सक्षम करतो. त्‍यामुळे दिवसभरातील काही वेळ निसर्गाच्‍या सानिध्‍यात घालवा.

१४ ) ध्‍यान करा

धान्‍य करण्‍याच्‍या अनेक पद्धती आहेत. यापैकी तुम्‍हाला योग्‍य वाटेल अशी एक पद्धत निवडा. दिवसभरातील पाच मिनिटे शांतपणे स्‍वत:च्या विचारावर चिंतन करा, तुम्‍हाला ध्‍यान करण्‍यात अडचणी येत असतील तर दीर्घश्‍वसनाचा अभ्‍यास करा. दिवसभरात तुम्‍ही कितीही व्‍यस्‍त असला तरी ध्‍यान करण्‍यासाठी वेळ काढा.

१५ ) स्‍वत:सह कुटुंबालाही वेळ द्‍या

तुमच्‍या दैनंदिन कामाबरोबर तुम्‍ही स्‍वत:सह कुटुंबालाही वेळ द्‍या. यासाठी तुमचा दिनक्रम बदला. महिन्‍यातील एक दिवस तुम्‍ही पूर्णवेळ स्‍वत:सह कुटुंबालाही वेळ द्‍या. कुटुंबाबरोबर पर्यटन स्‍थळाला भेट द्‍या. चित्रपट पाहा. विरंगुळा हा खूप महत्त्‍वाचा आहे. हेच आनंदाचे क्षण तुम्‍हाला अधिक सक्षमपणे पुन्‍हा नव्‍याने दैनंदिन कामाला लावता येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news