पुढारी ऑनलाईन डेस्क : शुक्रवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा कार चालवताना अपघात झाला. ही दुर्घटना हम्मदपूर झालजवळ रुरकीच्या नारसन सीमेवर घडली. अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पंतच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच त्याचा शिखर धवन सोबतचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पंत आणि धवन एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. (Rishabh Pant Accidet)
हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे. यात पंतला शिखर धवनने कार अनियंत्रीत वेगाने चालवू नकोस असा सल्ला दिला होता. आज पंतच्या अपघातानंतर धवनच्या त्या सल्ल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. जर पंतने आपल्या सिनिअर खेळाडूचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित तो आज रुग्णालयात नसता, असे अनेकांचे म्हणणे आहे.
हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पहाटे ५.३० वाजता पंतची कार दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात भारतीय यष्टीरक्षक थोडक्यात बचावला. अपघातानंतर धवन आणि पंत यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक वडिलधाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेऊ नका, असे कमेंट करत आहेत. (Rishabh Pant Accidet)
११ सेकंदाचा व्हिडिओ इंडियन प्रीमियर लीगदरम्यानचा आहे. पंत आणि धवन हे दोघेही दिल्ली कॅपिटल्स संघाच्या जर्सीत दिसत आहेत. यावेळी पंत शिखर धवनला म्हणतो, 'एक सल्ला… जो तुला मला द्यायचा आहे.' यावर धवन उत्तर देतो की, गाडी सावकाश चालवत जा. शिखरचा हा सल्ला ऐकून पंत हसतो. यानंतर पंत धवनला म्हणतो मी तुमचा सल्ला ऐकीन आणि मी आरामात गाडी चालवीन.'
हरिद्वारचे एस.एस.पी. अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुरकीमध्ये प्राथमिक उपचारानंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यासह त्याच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केले की, 'पंतसाठी प्रार्थना. सुदैवाने तो धोक्याबाहेर आहे. त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीसह जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी ऋषभला प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, पंतवर आपत्कालीन युनिटमध्ये उपचार करणारे डॉ. सुशील नागर म्हणाले की, 'पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. पहिल्या एक्स-रे अहवालानुसार त्याला फ्रॅक्चर नाही आणि कराने पेट घेतल्यानंतर त्याच्या शरीचा कुठलाही भाग होरपळलेला नाही. त्याच्या कपाळावर, डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात, गुडघा आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत.'
हेही वाचा;