पुढारी ऑनलाईन डेस्क : द. आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात मॅथ्यू रेनशॉचा समावेश केला असून त्याने 2018 नंतर पुनरागमन केले आहे. 4 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर हा कसोटी सामना सुरू होणार आहे.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन हे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले असून ते द. आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या आणि तिस-या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे मॅथ्यू रेनशॉ आणि अॅश्टन आगर यांचा संघात सामावेश करण्यात आला आहे. रेनशॉने मार्च 2018 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. तेव्हा स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना बॉल-टेम्परिंगसाठी निलंबित करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनपाठोपाठ मेलबर्न कसॉती जिंकून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा कसोटी सामना जिंकून पाहुण्या द. आफ्रिका संघाला व्हाईट वॉश देण्यासाठी ते आक्रमक खेळ करतील यात शंका नाही.
ग्रीनच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी, भारताविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. कांगारू संघ भारत दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेनंतर ग्रीन आयपीएलमध्ये सहभागी होणार होईल. त्याला मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, अॅश्टन अगर.