पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy 2023 : रणजी करंडक ब गटातील सामन्यात सौराष्ट्राने 41 वेळा रणजी चॅम्पियन असलेल्या मुंबईचा 48 धावांनी पराभव केला. सौराष्ट्रने मुंबईसमोर 280 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईचा डाव 230 धावांवर आटोपला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर हा सामना पार पडला.
तत्पूर्वी, सौराष्ट्रने पहिला फलंदाजी करताना पहिल्या डावात 289 धावा केल्या. त्यानंतर मुंबईला सुर्यकुमार यादवच्या 95 धावांच्या जोरावर 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. 59 धावांची आघाडी घेतल्यानंतर सौराष्ट्राने दुसऱ्या डावात 220 धावा केल्या आणि मुंबईला विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य दिले. पण मुंबईचा फ्लॉप शो दुसऱ्या डावातही कायम राहिला. त्यांचा संपूर्ण संघ 231 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईकडून दुस-या डावात पृथ्वी शॉने 68 तर, सुर्यकुमारने 38 धावा करून विजसाठी संघर्ष केला. (Ranji Trophy 2023)
सौराष्ट्रला जिंकण्यासाठी चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी फक्त दोन विकेट्सची गरज होती. सामन्याच्या पहिल्या सत्राच्या सात षटकांतच मुंबईचे उर्वरित दोन फलंदाज बाद झाले. तुषार देशपांडे आणि शम्स मुलाणी यांना माघारी धाडून सौराष्ट्रने मुंबईचा डाव गुंडाळला. (Ranji Trophy 2023)
सौराष्ट्रच्या विजयात सामनावीर धर्मेंद्रसिंह जडेजा, युवराज सिंग डोडिया आणि पार्थ भुत यांनी महत्त्वाचे योगदान दिले. जडेजाने पहिल्या डावात 24 धावा करून मुंबईच्या पहिल्या डावातील चार मौल्यवान विकेट घेतल्या. तर दुस-या डावात त्याने फलंदाजी करताना 90 धावा फटकावत दोन बळीही घेतले. तर डोडियाने मुंबईच्या पहिल्या आणि दुस-या डावातील 4-4 विकेट घेतल्या. तर भुतने मुंबईच्या दुस-या डावात चार बळी मिळवले.
आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमधला मुंबईचा हा पहिलाच पराभव आहे. त्यांचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तर हा सौराष्ट्रचा पहिलाच विजय आहे. या सामन्यानंतर मुंबईचे तीन सामन्यांतून 13 गुण झाले असून ते अजूनही गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत, तर सौराष्ट्र 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.