Team India : जिंकूनही टीम इंडियाला ‘या’ 5 गोष्टींची भीती! | पुढारी

Team India : जिंकूनही टीम इंडियाला ‘या’ 5 गोष्टींची भीती!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाने (Team India) बांगलादेशविरुद्धच्या आणखी एका कसोटी मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने बांगलादेशला त्याच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केले. टीम इंडियाने भलेही कसोटी मालिकेत यजमानांचा सफाया केला असेल, पण तरीही टीम इंडियासाठी सर्व काही चांगले झालेले नाही. अशा परिस्थितीत संघाला महत्त्वाच्या 5 गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. या बाबत वेळीच उपाय योजना आखून संघ व्यवस्थापनाने सावध राहणे गरजेचे आहे.

1. सलामीवीर कोण?

बांगला देश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. पण तो आगामी मालिकेत खेळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाची सलामीची जोडी कशी असेल? या मालिकेतील कर्णधार केएल राहुलला वगळले जाईल का? पहिल्या कसोटीचा सामनावीर कुलदीपला दुस-या सामन्यात खेळवण्यात आले नसताना फॉर्म गमावलेल्या राहुलचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता नक्कीच आहे. संघ व्यवस्थापनाला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

2. फिरकीविरुद्ध भारत बॅकफूटवर (Team India)

कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात भारताचा संघ चांगला मानला जातो, मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांना सहज विकेट्स दिल्या. यामध्ये एक-दोन नव्हे तर बहुतांश फलंदाज फिरकी खेळण्यात कमकुवत असल्याचे दिसून आले.

3. स्पिनरऐवजी वेगवान गोलंदाज का?

टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. असे असूनही, त्याने अशा खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाजांना खेळवले, ज्यावर अतिरिक्त फिरकीपटूला संधी देणे आवश्यक होते. अशातच कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पहिल्या सामन्याचा सामनावीर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

4. विराटचा फॉर्म

बांगला देश विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली फ्लॉप ठरला आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरायचे असेल आणि त्यानंतर ट्रॉफी उंचावायची असेल, तर विराटच्या फॉर्ममध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जिथे सर्वांच्या नजरा त्याच्या खेळीकडे असतील.

5. बुमराह, जडेजा, शमीच्या पुनरागमनानंतर टीम इंडिया प्लेईंग 11

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीचे पुनरागमन शक्य दिसत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, हाही एक प्रश्नच असेल. त्यामुळे येणा-या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Back to top button