

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी 2022 हे वर्ष चांगले राहिले आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने शानदार फलंदाजी करून पराक्रम केला आहे. तो या वर्षी भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिसरे स्थान मिळवले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर कसोटीत भारताने विजयाची नोंद केली. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ सामना गमावणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि आर अश्विनच्या (R ashwin) भागीदारीने टीम इंडियाचा पराभव टळला. हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. भारताने हा सामना 3 विकेटने जिंकून मालिका 2-0 ने खिशात घातली.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ढाका कसोटीच्या पहिल्या आणि दुस-या डावात अनुक्रमे 87 आणि नाबाद 29 धावा करत एकूण 116 धावा फटकावल्या. दरम्यान, दुस-या कसोटीपूर्वी त्याच्या नावावर 39 डावात 1580 धावांची नोंद होती. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने 19 धावा करताच त्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानच्या (1598) पुढे गेला. याचबरोबर तो 2022 या वर्षात 1696 धावा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
या यादीत बाबर आझम 2400 हून अधिक धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या लिटन दासच्या नावावर आहे. या वर्षात त्याने 1900 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर श्रेयस अय्यर हा भारतासाठी यावर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव आहे. त्याच्या नावावर 1400 हून अधिक धावा आहेत.