पुढारी ऑनलाईन डेस्क : india beat bangladesh : आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी 8 व्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 71 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला. अश्विनने 42 आणि अय्यरने 29 धावांची नाबाद खेळी केली. या जोडीने सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताला आवश्यक असणारे 145 धावांचे लक्ष्य गाठून बांगला देशच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. या विजयासह भारताने बांगलादेशचा त्यांच्याच घरच्या मैदानावर चौथ्यांदा क्लीन स्वीप केला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला भारताला 100 धावांची गरज होती. अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट क्रीजवर होते. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा केल्यानंतर शाकिबच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर ऋषभ पंतही पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात 93 धावांची शानदार खेळी करणाऱ्या पंतला दुसऱ्या डावात केवळ नऊ धावा करता आल्या. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू करून माघारी धाडले. मेहदी एवढ्यावरच थांबला नाही. अक्षर पटेलला तंबूचा रस्ता दाखवून डावातील पाचवी विकेट मिळवली. अक्षरने 69 चेंडूत 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 4 बाद 45 धावा झाल्या होत्या. आघाडी फळीतील फलंदाज राहुल, गिल, विराट, पुजारा हे तंबूत परतले होते. चौथ्या दिवशी विजयासाठी 100 धावांची गरज होती आणि मैदानात उनाडकट आणि अक्षर पटेल होते. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच उनाडकट बाद झाला. त्याला शकीब अल हसनने एलबीडब्ल्यू केले. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा केल्या. चेंडू आधी बॅटला लागला असे उनाडकटला वाटले. त्याने रिव्ह्यू घेतला पण तो व्यर्थ गेला आणि भारताला पाचवा धक्का बसला. या जोडीने चौथ्या दिवशी केवळे 11 धावांचे भर घातली. उनाडकट बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 56 होती.
उनाडकट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत क्रीजवर आला. पहिल्या डावात 93 धावांची खेळी करणा-या पंतने दुस-या डावात निराशा केली. मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू करून पंतच्या रुपात भारताला सर्वात मोठा धक्का दिला. पंत 13 चेंडूत नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेहदीचा चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 29 षटकात 6 विकेट गमावून 74 धावा होती. अन् विजयासाठी आणखी 71 धावा करायच्या होत्या.
मेहदी हसन मिराजने भारताला सातवा धक्का दिला. त्याने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले. अक्षर 69 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. यावेळी भारताला कसोटी जिंकण्यासाठी आणखी 71 धावा करायच्या होत्या. यावेळी भारताची 7 बाद धावसंख्या 74 होती. 74 धावांवर टीम इंडियाच्या सात विकेट पडल्या तेव्हा बांगलादेश चमत्कार करू शकेल असे वाटत होते. भारतीय संघ दडपणाखाली होता. यानंतर सामन्याची सूत्रे अश्विन आणि श्रेयस अय्यरने हाती घेतली आणि विजय मिळवण्याच्याच हेतून संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केले. दोघांनी धोकादायक वाटणा-या मेहदी हसन मिराज आणि शाकिबची फिरकी गोलंदाजी खेळून काढत संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून 71 धावांची नाबाद भागीदारी रचून 47 षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला. अश्विन 62 चेंडूत 42 तर श्रेयस अय्यरने 46 चेंडूत 29 धावा केल्या.
रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्यात 8 व्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. 90 वर्षांनंतर, भारताने कसोटीच्या चौथ्या डावात 8व्या विकेटसाठी 70+ धावांची भागीदारी केली. यापूर्वी 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना भारताच्या जहांगीर खान आणि लाल सिंग यांच्यात 74 धावांची भागीदारी झाली होती. तो सामना लॉर्ड्स मैदानावर 25 ते 28 जूनदरम्यान खेळवण्यात आला होता. टॉस जिंकून इंग्लंडने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 259 धावा केल्या. त्यानंतर भारताचा पहिला डाव 189 धावांतच दारद झाला. त्यामुळे इंग्लंडला 70 धावांची आघाडी मिळाली. दुस-या डावात इंग्लंडने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आणि 8 बाद 275 धावांवर हा डाव घोषित केला. याचबरोबर भारताला विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव कोसळला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा 187 मध्ये ऑलआऊट करून सामना 158 धावांनी जिंकला. पण या सामन्यात भारताच्या अमर सिंग (51) आणि लाल सिंग (29) यांनी सामन्याच्या चौथ्या डावात आठव्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी रचून भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती भारताच्या श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी ढाका कसोटीत केली. दोघांनी नाबाद 71 धावांची भागिदारी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारत आजपर्यंत बांगलादेशकडून कसोटीत हरलेला नाही. बांगलादेशवर भारताचा हा सलग 5 वा कसोटी विजय असून एकून 11 वी कसोटी जिंकली. टीम इंडियाने सलग तिसरी कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2015 मध्ये ड्रॉ मालिका खेळली गेली होती. भारताने बांगलादेशविरुद्ध सहावी मालिका जिंकली आहे.