पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) 2023 च्या लिलाव प्रक्रिया शुक्रवार, २३ डिसेंबर रोजी होणार आहे. या मिनी लिलावात ४०५ खेळाडूंवर १० फ्रँचायझी टीम बोली लावणार आहेत. हा लिलाव युवा खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जाणून घेवूया या मिनी लिलाव प्रक्रियेबाबत जाणून घेवूया. ( IPL 2023 Mini Auction )
IPL 2023 मिनी लिलावासाठी ९९१ खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. मात्र संघांनी ३६९ नावे निवडली. यानंतर आणखी ३६ खेळाडूंची नावे जोडण्यात यावीत असे फ्रँचायझीला विनंती करण्यात आली. यामुळे आता लिलावात एकूण खेळाडूंची संख्या ४०५ झाली आहे. १० फ्रँचायझी टीममध्ये एकुण ८७ खेळाडूंची निवड होणार आहे.
गेल्या आयपीएलमध्येच मेगा लिलाव झाला होता. त्यामुळे यावेळी मिनी लिलाव होणार आहे. यामध्ये लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन वनीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. आता सर्वच संघांना समान संधी मिळावी या हेतूने २३ डिसेंबरला एक दिवसांचा मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मेगा लिलावामध्ये अनेक संघांनी आपले कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता मिनी लिलावात १० संघांना फक्त ८७ खेळाडूंची गरज आहे. आता IPL लिलाव 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी अडीच वाजता केरळ येथील कोची येथे सुरु होईल. लिलावात ४०५ खेळाडूंवर बोली लागणार आहे. याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर 'स्टार स्पोर्ट्स' चॅनेलवर तर ऑनलाईन 'जिओ सिनेमा'वर पाहता येणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल समिती ही संयुक्तपणे ही लिलाव प्रक्रिया पार पाडणार आहे. यजमान ( होस्ट ) हे इंग्लंडचे ह्यू अॅडम्स असतील त्यांनीच मागील मेगा लिलावाचे आयोजन केले होते. यापूर्वी ही जबाबदारी रिचर्ड मॅडले यांनी पार पाडली होती. लिलाव प्रक्रियेत खेळाडूवर बोली लागते तेव्हा लिलावकर्ता खेळाडूची किंमत वाढल्याने त्याची घोषण करतो. जेव्हा सर्वोच्च बोली प्राप्त होते. तेव्हा लिलावकर्ता डेस्कवर हातोडा मारुन खेळाडूची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट करतो.
मेगा लिलावात संघांकडे ९० कोटी रुपयांची मर्यादा होती. आता यामध्ये पाच कोटींची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे एक फ्रँचायझी टीम ही २५ खेळाडूंचा संघ बनवण्यासाठी जास्तीत जास्त ९५ कोटी रुपये खर्च करु शकणार आहे. तसेच मेगा लिलावानंतर काही फ्रँचायझी टीमकडे पैसे शिल्लक होते. आता लिलावापूर्वी ज्या संघांना आपल्या खेळाडूंना कमी केले आहे. त्या खेळाडूंची किंमत आणि मेगा लिलावातील उर्वरित रक्कम यातून मिनी लिलावात फ्रँचायझी टीम बोली लावणार आहेत.
आयपीएलमध्ये सध्या १० संघ आहेत. एक फ्रँचायझी टीम आपल्या संघात १८ ते २५ खेळाडूंची निवड करु शकते. एका संघात जास्तीत जास्त ८ विदेशी खेळाडूंची निवड करता येते. सध्या फ्रँचायझी टीमचा विचार करता सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) यांच्याकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. या संघांना अनुक्रमे 13, 11 आणि 10 खेळाडूंची आवश्यकता आहे. त्यामुळे मिनी लिलावात हे संघ जास्तीत जास्त खेळाडूंवर बोली लावताना दिसतील.
मिनी लिलावा कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक आहेत याचा विचार करता कोलकाता नाइट रायडर्स या संघाकडे सर्वात कमी ७.०५ कोटी रुपये आहेत. त्यांना संघ पूर्ण करण्यासाठी आता या रक्कमेत उर्वरीत चार खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाकडे ४२.२५ कोटी तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडेही केवळ 8.75 कोटी रुपये आहेत.
आयपीएल मिनी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. यामध्ये ७१४ भारतीय आणि २७७ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची नावे फ्रँचायझी टीमला पाठविवण्यात आली आहे. १० संघांनी ९९१ खेळाडूंपैकी ४०५ खेळाडूंना खरेदी करण्यात आपला रस दाखवला आहे. यामुळे आता मिनी लिलावात ४०५ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या ४०५ खेळाडूंपैकी २७३ भारतीय तर १३२ विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये १२३ आतंरराष्ट्रीय आणि २८२ अनकॅप्ड ( आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसलेले ) खेळाडूंचा समावेश आहे. अनकॅप्डमध्ये अंडर-19 आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणार्या खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावात सहभागी दिवेशी खेळाडूंची संख्या कंसात: इंग्लंड ( २७), दक्षिण आफ्रिका ( २२), ऑस्ट्रेलिया ( २१), वेस्ट इंडिज ( २०),न्यूझीलंड ( १०), श्रीलंका ( १०), अफगाणिस्तान ( ८), आयर्लंड ( ४), बांगलादेश ( ४), झिम्बाब्वे ( २), नामिबिया ( २), नेदरलँड्स (१) आणि युएई ( १)
४०५ खेळाडूंची ४३ वेगवेगळ्या सेट (संच)मध्ये विभागणी करण्यात आली आहे. एका सेटमध्ये ५ ते ८ खेळाडू आहेत. पहिल्या पाच सेटमध्ये ३१ आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. लिलाव प्रक्रियेवेळी सर्वप्रथम फलंदाज त्यानंतर यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांच्यावर बोली लागेल. लिलावातील सेट क्रमांक ६ ते १० पर्यंत ३५ अनकॅप्ड खेळाडू असतील. त्यामुळे सुरुवातील नावे असणार्या ८६ खेळाडूंवरील लिलाव हे सामान्य गतीने होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. यामुळे खरेदीचा विचार करण्यासाठी संघांना अधिक वेळ मिळेल. ८७ व्या खेळाडूचा क्रमांक येताच लिलाव प्रक्रियेचा वेग वाढेल. यानंतर खरेदी करणार्या संघाना झटपट बोली लावली लागेल. ८७ ते ४०५ या क्रमांकाच्या खेळाडूंवरील बोली ही झटपट संपेल.
मिनी लिलावातील २ कोटी रुपये ही सर्वोच्च आधारभूत किंमत आहे. २ कोटींची बोली असणारे १९ खेळाडू आहेत. यामध्ये रिले रुसो, केन विल्यमसन, सॅम कुरन, कॅमेरॉन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बॅंटन, निकोलस पूरन, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, आदिल रशीद, ट्रॅव्हिस हेड, रॅसी व्हॅन डर डसेन, जिमी नीशम, ख्रिस लिन, क्रेग ओव्हरटन आणि जेमी ओव्हरटन यांचा समावेश आहे.
दीड कोटीचे ११ आणि एक कोटींची मूळ किंमत असणारे २० खेळाडू आहेत. यामध्ये नॅथन कुल्टर-नाईल, शॉन अॅबॉट, जेसन रॉय, रिले मेरेडिथ, शेरफेन रदरफोर्ड, डेविड मलान, विल जॅक्स, अॅडम झाम्पा, झ्ये रिचर्डसन, साकिब अल हसन, हॅरी ब्रूक आणि टायमल मिल्स यांचा समावेश आहे.
एक कोटी मूळ किंमत असणार्या खेळाडूंमध्ये मयंक अग्रवाल, जो रूट, हेनरिक क्लासेन, अकिल हुसेन, मुजीब-उर रहमान, तबरेझ शम्सी, मनीष पांडे, डॅरिल मिशेल, मोहम्मद नबी, काइल जेम्सन, शाई होप, टॉम लॅथम, मायकेल ब्रेसवेल, अँड्र्यू टाय, ल्यूक वुड, डेव्हिड विस, मोजे हेन्रिक्स, मॅट हेन्री, रोस्टन चेस आणि रहकीम कॉर्नवॉल यांचा समावेश आहे.
७५ लाखांच्या मूळ किंमत असणारे ९ खेळाडू असून, यामध्ये रीस टोपले, वेन पारनेल, डॅनियल सॅम्स, जोशुआ फिलिप, इश सोधी, टॉम करन, डी'आर्सी शॉर्ट, डेव्हिड पेन आणि कार्लोस ब्रॅथवेट यांचा समावेश आहे. याशिवाय २०, ३०, ४० आणि ५० लाखांच्या मूळ किंमतीत ३४६ खेळाडूची नावे आहेत. यातील बहुतांश खेळाडूंची मूळ किंमत ही २० लाख रुपये आहे.
आयपीएल २०२३ मध्ये १० फ्रँचायझी टीम सहभागी होणार आहेत. आयपीएल २०२३ हे मार्च महिन्याच्या तिसर्या आठवड्यात सुरु होईल. यंदाचा हंगाम मे महिन्यापर्यंत चालणार आहे. २०२२ मध्ये आयपीएल २६ मार्च ते २९ मेपर्यंत चालले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
हेही वाचा :