IPL 2023 : पोलार्ड मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक | पुढारी

IPL 2023 : पोलार्ड मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक

मुंबई, वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सने 2023 च्या हंगामासाठी खेळाडूंच्या यादीतून रिलिज केल्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने आता आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तथापि, तो अजूनही मुंबई इंडियन्सचा भाग असेल. कारण संघ मालकांनी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या अनुभवी खेळाडूची मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) पासून तो ही जबाबदारी सांभाळणार आहे. एवढेच नाही तर तो एमआय एमिरेटस्कडून खेळतानाही दिसणार आहे.

किरॉन पोलार्ड 2010 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि संघासाठी 150 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्ससोबत 5 आयपीएल आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नसताना किरॉन पोलार्डने काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही भूषवले आहे.

मुंबईसोबत नाही तर कोणाकडूनही नाही..! (IPL 2023)

माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता. पण खूप विचाराअंती मी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मला मुंबई इंडियन्ससोबत खेळता येत नसेल तर मी कोणत्याही संघाकडून खेळणार नाही. मी मुंबईच्या विरुद्ध खेळतोय हे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. एकदा आपण मुंबई संघाशी जोडलो तर आपण कायम मुंबईचे होऊन जातो. गेले 13 हंगाम मी आयपीएलमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी संघाचे प्रतिनिधित्व केले, याचा मला खूप अभिमान, सन्मान वाटतो.

मी धन्य झालो… यानिमित्ताने मी मुकेश, नीता आणि आकाश अंबानी यांचे आभार मानतो. त्यांनी मला नेहमीच प्रचंड प्रेम, समर्थन आणि आदर दिला, माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला आमची पहिली भेट आठवते जेव्हा मुंबई संघात मी दाखल झालो. सगळ्यांनी माझं खूप मनापासून स्वागत केले. आपण एक परिवार आहोत, असे सांगितले. ते नुसते शब्द नव्हते तर ते माझ्याशी भावनेसारखे जोडले गेले आहेत.

किरॉन पोलार्डची आयपीएल कारकीर्द (IPL 2023)

पोलार्ड 2010 पासून आयपीएलशी जोडला गेला आहे. त्याने लीगमधील 189 सामन्यांमध्ये 28.67 च्या सरासरीने आणि 147.32 च्या स्ट्राईक रेटने 3412 धावा केल्या. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. याशिवाय गोलंदाजीतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण 69 विकेट घेतल्या आहेत. 44 धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

Back to top button