पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधील त्याचे चाहते आणि क्रिकेट विश्लेषक त्याची तुलना नेहमी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत करतात. मात्र, अशी तुलना करणे थांबवा, असे मत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. तसेच बाबरच्या कर्णधारपद आणि फलंदाजीबद्दलही त्याने जोरदार टीका केली आहे. नुकतेच कराची कसोटीच्या इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. यानंतर बाबर याच्यावर पाकिस्तानमध्ये टीकेची झोड उडाली आहे. ( Virat and Babar )
आपल्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तान माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया म्हणाला की, पाकिस्तानी फलंदाजीतील कोणत्याही फलंदाजाची भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्याबरोबर तुलना होऊ शकत नाही. पाकिस्तानमधील लोकांनी बाबरची विराटशी तुलना करणे थांबवावे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे खूप मोठे खेळाडू आहेत. पाकिस्तान संघात विराटशी तुलना होऊ शकेल, असा एकही खेळाडू नाही.
बाबारच्या कर्णधारपदाला शून्य गुण देत कनेरिया याने म्हटले की, बाबरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याकडून कर्णधारपद कसे करावे याचे धडे घ्यावेत. कर्णधार म्हणून बाबर हा शून्य आहे. त्याने बेन स्टोक्सकडे पाहून कर्णधारपद कसे करतात हे शिकावे, तसेच आपला अहंकार बाजूला ठेवून त्याने याबाबत सर्फराज अहमदबरोबर चर्चा करावी, असे आवाहनही त्याने केले आहे.
हेही वाचा :