KKR vs RCB : आरसीबीचा लाजिरवाणा पराभव | पुढारी

KKR vs RCB : आरसीबीचा लाजिरवाणा पराभव

अबू धाबी; वृत्तसंस्था : KKR vs RCB : आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात धमाकेदार कामगिरी करणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा दुसर्‍या सत्राची सुरुवात मात्र केविलवाणी झाली. त्यांना कोलकाता नाईट रायडर्सने 9 विकेट आणि दहा षटके शिल्लक ठेवून हरवले. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीसह इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स संघाला 19 षटकांत 92 धावांत ऑल आऊट केले.

हे टार्गेट केकेआरच्या शुभमन गिल (48) आणि वेंकटेश अय्यर (41) यांनी पूर्ण केले. विजयासमीप आला असताना शुभमन बाद झाला. केकेआरच्या रसेलने 9 धावांत 3, चक्रवर्तीने 13 धावांत 3 विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसनने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 22 धावा केल्या.

आरसीबीने (KKR vs RCB) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीने निराशा केली. चौकार मारत दमदार सुरुवात करणार्‍या विराटला प्रसिद्ध कृष्णाने अवघ्या 5 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

विराट बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि पदार्पण करणारा श्रीकर भारत यांनी आरसीबीचा डाव सावरण्यास सुरुवात केली. मात्र पॉवर प्ले संपत असतानाच लॉकी फर्ग्युसनने 22 धावा करणार्‍या पडिक्कलला बाद केले. त्यानंतर आंद्रे रसेलने श्रीकरला 16 धावांवर माघारी धाडले.

यानंतर आरसीबीला सावरायला स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स मैदानात आला. मात्र रसेलने त्याला एक उत्कृष्ट यॉर्कर टाकत त्याची पहिल्याच चेंडूवर दांडी गुल केली. यामुळे आरसीबीची अवस्था 2 बाद 41 वरून 4 बाद 52 अशी झाली. एबी डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर आरसीबीची सर्व मदार ग्लेन मॅक्सवेलवर होती. मात्र वरुण चक्रवर्तीने त्याचा 10 धावांवर त्रिफळा उडवत आरसीबीला पाचवा आणि मोठा धक्का दिला.

चक्रवर्तीने पुढच्याच चेंडूवर वानिंदू हसरंगाला पायचित पकडत आरसीबीला सहावा धक्का दिला. मात्र त्याला हॅट्ट्रिक साधता आली नाही. पण, पुढच्याच षटकात त्याने सचिन बेबीला 7 धावांवर बाद करत आरसीबीला सातवा धक्का दिला. हर्षल पटेलने 12 धावांची खेळी करत संघाला शतकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकी फर्ग्युसनने त्याला बाद केले. त्यानंतर रसेलने सिराजच्या रूपाने आपली तिसरी शिकार केली. आरसीबीचा डाव 92 धावात संपुष्टात आला. हे आव्हान केकेआरने लीलया पार केले.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : 19 षटकांत सर्वबाद 92. (देवदत्त पडिक्कल 22, श्रीकर भरत 16, वरुण चक्रवर्ती 3/13, आंद्रे रसेल 3/9, लॉकी फर्ग्युसन 2/24.)
कोलकाता नाईट रायडर्स : 10 षटकांत 1 बाद 94. (शुभमन गिल 48, वेंकटेश अय्यर 41. यजुवेंद्र चहल 1/19.)

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मन उडू उडू झालं अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत बरोबर गणपती मूर्ती बनवण्याची स्पर्धा!

Back to top button