अंतराळातही चीनचे तळ! कार्गो स्पेसशिप चे प्रक्षेपण | पुढारी

अंतराळातही चीनचे तळ! कार्गो स्पेसशिप चे प्रक्षेपण

बीजिंग ; वृत्तसंस्था : चीनने आपल्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर रसद पोहोचविण्यासाठी सोमवारी एका कार्गो स्पेसशिप चे प्रक्षेपण केले. सलग दुसर्‍या अंतराळ मोहिमेची तयारी लक्षात घेता हे प्रक्षेपण करण्यात आले. ‘तियानझोऊ 3’ या ‘कार्गो स्पेसशिप’ने हॅनॉनमधील ‘वेन्चांग स्पेसक्राफ्ट लाँच सेंटर’वरून उड्डाण घेतले.

अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर चिनी अंतराळवीर परतल्यानंतर तीनच दिवसांनी हे कार्गो स्पेसशिप (मालवाहतूक अंतराळयान) पाठविण्यात आले आहे. ‘तियानझोऊ’ या चिनी शब्दाचा अर्थ स्वर्गाचे विमान असा आहे. जवळपास 8 ते 9 तासांचा प्रवास करून हे यान अंतराळ स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे.

तंत्रज्ञान पडताळणीच्या टप्प्यातील 5 वे उड्डाण

तियानझोऊ-3 कार्गो अंतराळ यानाचे प्रक्षेपण हे अंतराळ स्थानक उभारणी आणि तंत्रज्ञान पडताळणीच्या टप्प्यातील चीनची 5 वी मोहीम आहे. हे उड्डाण आगामी 3 अंतराळवीरांसाठी 6 महिने पुरेल अशी व्यवस्था, अतिरिक्त स्पेस सूट, उभारणी सामग्री आणि इंधन घेऊन रवाना झाले आहे.

शुक्रवारी परतले 3 अंतराळवीर

चिनी अंतराळ स्थानकावर 3 अंतराळवीरांनी सलग 90 दिवस स्थानक उभारणीशी संबंधित कामे केली आणि ती आटोपल्यानंतर ते पृथ्वीवर परतले. चिनी अंतराळवीरांची ही आजवरची सर्वात प्रदीर्घ मानवयुक्‍त अंतराळ मोहीम ठरली आहे. नी हाईशेंग, लियू बोमिंग आणि टँग होंग्बो दुपारी दीड वाजता शेनझोऊ-12 या यानाने परतले.

Back to top button