किरीट सोमय्या यांचा दौरा अन् महामार्गावर पोलिसांचा खडा पहारा | पुढारी

किरीट सोमय्या यांचा दौरा अन् महामार्गावर पोलिसांचा खडा पहारा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बहुचर्चित कोल्हापूर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने कमालीची खबरदारी घेतली होती.

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी सकाळपासून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत ऑनड्युटी असलेला पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री तीन वाजता पुणे-बंगळूर महामार्गावर डेरेदाखल झाला.

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बहुचर्चित कोल्हापूर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने कमालीची खबरदारी घेतली होती. किणी टोल नाक्यापासून कागलपर्यंत सातशेवर पोलिसांचा पहारा होता. बस, रेल्वेसह रिक्षा स्थानक आणि वर्दळीच्या ठिकाणीही पोलिस डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. सोमय्यांना पहाटे कराडमध्ये ताब्यात घेतल्याची बातमी धडकताच सार्‍यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोपानंतर जिल्ह्यात आघाडी सरकार आणि भाजप नेत्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी कोल्हापूर दौर्‍याची घोषणा केल्यामुळे वातावरण तापले होते.

वाहनांची कडक तपासणी

किणी टोल नाका, सांगली फाटा, तावडे हॉटेल, उजळाईवाडी उड्डाणपुलासह महामार्गाला जोडणार्‍या सर्वच मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत होती.

महामार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

मध्यरात्री तीन वाजता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह सातशेवर पोलिसांचा फौजफाटा पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाका ते कागल बसस्थानक दरम्यान दाखल झाला होता. पोलिस मुख्यालय, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, करवीरसह शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, कागल, मुरगूडशिवाय हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, शहापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी, पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.

प्रशासनाकडून खबरदारी

सोमय्या यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदी आदेशही जारी केला होता. जिल्ह्यातील आघाडी सरकार समर्थकासह भाजप नेत्यांनाही प्रशासनाने सबुरीचा सल्ला देत शांतता सुव्यवस्थेला बाधा निर्माण केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली होती.

मिरवणुकीची सांगता होताच फॉलोऑन

विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, मंगेश चव्हाण, गणेश इंगळे, बाबूराव महाजन, रामेश्वर वैंजने यांच्यासह संपुर्ण फौजफाटा फिल्डवर होता. विसर्जन मिरवणुकीची मध्यरात्री सांगता होताच तासाच्या अंतराने पोलिसांना फॉलोऑन करण्यात आले.

…मग पोलिसांनी घेतला मोकळा श्वास

अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रमोद जाधव, शिवानंद कुंभार, किरण भोसले यांच्यासह पोलिस पथक मध्यरात्री कराड रेल्वे स्थानक येथे रवाना झाले.कराड रेल्वे स्थानकात रेल्वे दाखल होताच काकडेसह पथकाने सोमय्या यांना गराडा घालून त्यांना ताब्यात घेतले. सोमय्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच पोलिस दलातील सर्वच घटकांनी मोकळा श्वास घेतला.

डोळ्यात तेल घालून तपासणी

भाजप नेते सोमय्या कोणत्याही मार्गाने, कोणत्याही क्षणी शहरात प्रवेश करू शकतील, अशी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना शंका होती.त्यामुळे पोलिस अधीक्षक बलकवडे स्वत: जातीने महामार्गावर उपस्थित होते.कर्तव्यात कोणत्याही स्थितीत कुचराई करू नका, असे ते अधिकारी, पोलिसांना वारंवार बजावत होते. अधिकारी, पोलिस डोळ्यात तेल घालून हालचालीवर लक्ष नियंत्रित करीत होते.

Back to top button