

दोहा, वृत्तसंस्था : 'फिफा' वर्ल्डकप स्पर्धेची (FIFA World Cup 2022) अंतिम फेरी खेळण्याची संधी मुकलेले क्रोएशिया आणि मोरोक्को संघ शनिवारी (दि. 17) तिसर्या क्रमांकासाठी एकमेकांविरुद्ध झुंजणार आहेत. क्रोएशियाला अर्जेंटिनाकडून, तर मोरोक्कोला फ्रान्सकडून उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. क्रोएशिया संघ गत 2018 च्या स्पर्धेतील उपविजेता आहे. त्यांना हरवणारा फ्रान्स सलग दुसर्यांदा अंतिम फेरीत खेळणार आहे; परंतु क्रोएशियाला आता तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागू शकते. दुसरीकडे, मोरोक्कोला गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांनी विश्वचषकात प्रथमच इतकी मोठी मजल मारली आहे. त्यामुळे तिसरा असो वा चौथा क्रमांक, या संघासाठी मोठी कमाई ठरणार आहे.
येथे जिंकणारा संघही मालामाल होणार आहे. तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ट्रॉफी मिळणार नसली, तरी तब्बल 220 कोटी रुपयांचे पारितोषिक 'फिफा'कडून मिळणार आहे. स्पर्धा सुरू झाली तेव्हा उपविजेत्या क्रोएशिया संघाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्यावेळेची भरपाई यंदा ते विजेतेपदामध्ये करतात का, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलला त्यांनी स्पर्धेबाहेर करीत त्याद़ृष्टीने वाटचालही केली होती; परंतु वाटेत त्यांना अर्जेंटिनाचा अडथळा पार करता आला नाही. त्यामुळे त्यांना तिसर्या क्रमांकासाठी खेळावे लागत आहे. (FIFA World Cup 2022)
दुसरीकडे, मोरोक्कोची या स्पर्धेतील वाटचाल स्वप्नवत अशीच ठरली आहे. त्यांनी साखळी फेरीत क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यानंतर द्वितीय मानांकित बेल्जियमला हरवून आपल्याकडेे लक्ष वेधून घेतले. राऊंड 16 मध्ये स्पेन आणि उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी पोर्तुगालला स्पर्धेबाहेर काढून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीतही त्यांनी जगज्जेत्या फ्रान्सला तगडी झुंज दिली; परंतु फ्रान्सने त्यांना हरवून अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा;