Lakshya Sen : बॅडमिंटनपटू लक्ष्‍य सेनवर गुन्‍हा दाखल, वयाबाबत चुकीची माहिती दिल्‍याचा आरोप | पुढारी

Lakshya Sen : बॅडमिंटनपटू लक्ष्‍य सेनवर गुन्‍हा दाखल, वयाबाबत चुकीची माहिती दिल्‍याचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील सुर्वण पदक विजेता, अर्जुन पुरस्‍काराचा मानकरी बॅडमिंटनपटू लक्ष्‍य सेन ( Lakshya Sen ) याच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. ज्‍युनिअर स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी त्‍याने आपल्‍या वयाबाबत चुकीची माहिती दिल्‍याचा आरोप आहे. या प्रकरणी लक्ष्‍य सेन, त्‍यांचे आई-वडील, भाऊ आणि प्रशिक्षक यांच्‍या विरुद्‍ध बंगळूरमध्‍ये गुन्‍हा दाखल झाला आहे.

बंगळूर पोलिसात एम. जी. नागराजा यांनी तक्रार दाखल केली. ते एक बॅडमिंटन अकॅडमी चालवतात. नुकतेच बंगळूरमधील न्‍यायालयाने २१ वर्षीय लक्ष्‍य सेन याच्‍याविरोधातील आरोपांची चौकशी करण्‍यात यावी, असे आदेश दिले  होते.

Lakshya Sen : कुटुंबातील सदस्‍यांसह प्रशिक्षकावरही गुन्‍हा दाखल

एफआयआरमध्ये लक्ष्य, त्याचे प्रशिक्षक विमल कुमार, लक्ष्‍य याचे वडील धीरेंद्र सेन, त्याचा भाऊ चिराग आणि आई निर्मला सेन यांच्या नावाचा समावेश आहे. चिराग स्वतः बॅडमिंटनपटू आहे. धीरेंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागराजाचा आरोप आहे की, प्रशिक्षक विमल यांनी लक्ष्याच्या आई-वडिलांच्या सहकार्याने २०१० मध्ये जन्म प्रमाणपत्र तयार केले होते. ज्यामध्ये चिराग आणि लक्ष्य यांच्या वयाबाबत चुकीची माहिती देण्‍यात आली. यामुळे लक्ष्य याला ज्‍युनिअर स्‍पर्धेत भाग घेता आला. वयाबाबत त्‍याने वस्‍तुनिष्‍ठ माहिती दिली असती तर तो स्पर्धेसाठी अपात्र ठरला असता.

एम. जी. नागराजा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, लक्ष्यचा जन्म 1998 मध्ये झाला होता, मात्र लक्ष्याचा जन्म 2001 मध्ये झाल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते.कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्या पाठिंब्याने लक्ष्यने कमी वय दाखवून खेळण्यास सुरुवात केली. वयाचा फायदा म्हणून लक्ष्याने अनेक स्पर्धा जिंकल्या . तसेच त्‍याने सरकारकडून अनेक फायदे मिळवले. यामुळे अनेक प्रतिभावंत मुलांचे नुकसान झाले आहे.

लक्ष्य आणि इतरांवर कलम 420 (फसवणूक), 468 (फसवणुकीच्या हेतूने कट करणे) आणि 471 (खोट्या रेकॉर्डचा वापर करणे) यासह विविध आयपीसी कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्यने नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. नुकतेच त्‍याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते

सर्व आरोप निराधार : विमल कुमार

” लक्ष्य आमच्या अकॅडमीत आला. मी त्याला 2010 पासून इतर मुलांप्रमाणे प्रशिक्षण दिले. एक कुटुंब जाणीवपूर्वक अकॅडमी आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आरोप निराधार आहेत, असा दावा लक्ष्‍य सेनेचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button