नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय नौदलात सुमारे ३ हजार अग्निवीर दाखल झाले असून त्यात ३४१ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी दिली आहे. नौदलात प्रथमच महिला खलाशांना (सेलर) संधी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी आधीच दाखल झाली आहे. पुढच्या वर्षी सर्व शांखामध्ये महिला अधिकाऱ्यांना सामील करून घेणार आहोत. महिलांना केवळ ७-८ शाखांपुरती संधी नाही तर सर्व शांखामध्ये त्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या आम्ही ३४१ महिला अग्निवीरांना नौदलात सामील केले आहे. महिलांना प्रथमच रँकमध्ये समाविष्ट केले जात आहे. महिलांना वेगळे समाविष्ट केले जात नाही. त्यांना पुरुषांप्रमाणेच संधी दिली जात आहे. ही निवडीची एकसमान पद्धत आहे. त्यांना जहाजे, एअरबेस, विमानांवर तैनात केले जाणार आहे. सामान्य खलाशांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणात कोणताही फरक केला जाणार नाही, असेही ॲडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितले.
अलीकडील जागतिक स्तरावरील काही घटना अधोरेखित करतात की आम्ही आमच्या स्वतःच्या सुरक्षेच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. आत्मनिर्भर भारताबद्दल केंद्र सरकारने आम्हाला अतिशय स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत आणि आम्ही २०४७ पर्यंत नौदलास आत्मनिर्भर नौदल बनू, असेही ते म्हणाले.
हिंद महासागरात अनेक चिनी जहाजे आहेत. आमच्याकडे सुमारे ४-६ पीएलए नौदलाची जहाजे आहेत. त्यानंतर काही संशोधन जहाजे कार्यरत आहेत. हिंद महासागर क्षेत्रात मोठ्या संख्येने चिनी मासेमारी जहाजांचा वावर आहेत. आम्ही सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा :