Rajasthan Sikar gang war | गँगवॉरने राजस्थान हादरले! गँगस्टर राजू ठेहटसह दोघांची हत्या, बिश्नोई गँगने स्वीकारली हत्येची जबाबदारी | पुढारी

Rajasthan Sikar gang war | गँगवॉरने राजस्थान हादरले! गँगस्टर राजू ठेहटसह दोघांची हत्या, बिश्नोई गँगने स्वीकारली हत्येची जबाबदारी

सीकर (राजस्थान) : पुढारी ऑनलाईन; राजस्थानच्या सीकरमध्ये शनिवारी झालेल्या गँगवॉरमध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्यांमध्ये गँगस्टर राजू ठेहट याचा समावेश आहे. तो वीर ताज सेना गँगमधील गुन्हेगार आहे. राजू ठेहटच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी सीकर बंदचे आवाहन केले. जोपर्यंत राजूची हत्या करणार्‍यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देणार नाही, अशी पवित्रा त्याच्या समर्थकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने राजू ठेहट याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. रोहित गोदारा नावाच्या युजरने फेसबुकच्या माध्यमातून राजूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

“राजू हा अनेक दिवसांपासून गुन्हेगारी कारवायात गुंतला होता, त्याला गोळ्या लागल्या आहेत. उपलब्ध असलेल्या ताज्या माहितीनुसार, त्याचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, चार जण गोळीबारात सामील होते, अशी माहिती सीकरचे एसपी कुंवर राष्ट्रदीप यांनी दिली आहे.

“गुन्हेगारीच्या गोळीबारात गोळी लागून जखमी झालेल्या ताराचंद जाट या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ वसतिगृहात असलेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला होता,” असे सीकरचे एसपी राष्ट्रदीप यांनी सांगितले.
रोहित गोदारा नावाच्या युजरने फेसबुक पोस्टमध्ये गँगस्टर आनंदपाल आणि बलबीर बानुदा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याने पुढे लिहिले की, “मी हत्येची जबाबदारी घेतो, बदला पूर्ण झाला…” विशेष म्हणजे, गँगस्टर आनंदपाल पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्यानंतर आनंदपाल गँगमधील सदस्य लॉरेन्स बिश्नोई टोळीत सामील झाले. सीकरमधील गँगवॉरमध्ये दोन्ही गँगचा सहभाग होता.

दरम्यान, राजस्थानचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार शक्य ती सर्व पावले उचलेल आणि या गुंडांना तुरुंगात टाकेल.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, चार-पाच जणांच्या गँगने राजू ठेहट याच्या घराजवळ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. राजू ठेहट याच्या हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. ठेहट याला तीन गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. हरियाणा आणि झुंझुनूच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गँगस्टर राजू ठेहट गुन्हेगारी जग सोडून राजकारणात येणार होता. त्यापूर्वीच त्याला मारण्यात आले आहे.

सीकरचे एसपी कुंवर राष्ट्रदीप यांनी राजू ठेहट याची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हत्याकांडात चार तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये एक तरुण राजूशी बोलत असल्याचे दिसून आले आहे. असे वाटते की दोघांची अगोदरपासून ओळख होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारात एक तरुणही जखमी झाला आहे.

सीसीटीव्ही फुटेज मिळाले….

राजू ठेहट हत्याकांडाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यामध्ये ठेहट यांच्या घरासमोर एक ट्रॅक्टर थांबल्याचे दिसते. राजू ठेहट यांच्या घराबाहेर चार-पाच लोक येतात. त्यानंतर ते गोळीबार करतात. त्यानंतक राजू जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे याची ते खात्री करतात. राजू ठेहट याचा १९९५ पासून गुन्हेगारी जगतात दबदबा होता. १९९८ मध्ये बलबीर बानुडा आणि राजू ठेहट यांनी मिळून सीकरमध्ये भेभाराम हत्याकांड घडवून आणले. येथूनच गँगवार सुरू झाले होते.

हे ही वाचा :

 

Back to top button