FIFA World Cup : अर्जेंटिनासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ | पुढारी

FIFA World Cup : अर्जेंटिनासाठी आजचा सामना 'करो या मरो'

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) आजचा (दि.२६) दिवस खास आहे. आज होणाऱ्या सामन्यामध्ये गतविजेता फ्रान्स तसेच विजेतेपदाचा दावेदार मानले जात असलेल्या अर्जेंटिना हे संघ स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा फ्रान्सचा संघ डेन्मार्कविरूध्दचा सामना जिंकून आपल्या गटात अग्रस्‍थानी राहण्‍याचा प्रयत्‍न करेल. तर, सौदी अऱेबियाकडून पहिल्याच सामन्यात २-१ ने पराभूत झालेल्या अर्जेंटिनाला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी मेक्सिकोला चांगल्या गोल फरकाने पराभूत करावे लागेल.

अर्जेंटिनासाठी आजचा सामना महत्त्‍वपूर्ण

पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभवाला सामोरे (FIFA World Cup) गेलेला अर्जेंटिनाला मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात ‘करो या मरो’अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सामन्यात मेस्सी व साथीदारांना मेक्सिकोविरूध्द चांगल्या गोल फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. अर्जेंटिना ग्रुप ‘सी’ मध्ये एका सामन्यातील पराभवासह चौथ्या स्थानावर आहे. सौदी अऱेबियाने अर्जेंटिनावर एक गोल अधिक केल्याने त्यांचा गोल डिफरन्स -१ आहे. त्यामुळे त्यांना मेक्सिकोला चांगल्या गोल फरकाने पराभूत करणे महत्वाचे आहे.

अर्जेंटिनावर असेल प्रचंड दबाव

सौदी अरेबियाकडून २-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाची जगभरात खिल्ली उडवण्यात आली. शनिवारी मेक्सिकोविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला बाऊन्स बॅक करण्यासाठी प्रचंड दबाव असेल. पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे अर्जेंटिनाचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आले आहे. आता स्पर्धेतील अस्तित्व जिवंत ठेवण्‍यासाठी त्यांना मेक्सिकोला चांगल्या गोल फरकाने पराभूत करावे लागणार आहे. मेस्किोकोचा संघ अर्जेंटिनाला सामन्यात कडवी झुंज देऊ शकतो. आजच्या सामन्यात जर मेस्किकोने अर्जेंटिनाला पराभूत केले. तर, अर्जेंटिना स्पर्धेतून बाहेर होईल.

अर्जेंटिनाचा माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक गेरार्डो मार्टिनो हे आता मेक्सिकोचे प्रशिक्षक आहेत. प्रतिस्पर्धी संघाला जोरदार धक्का देण्याची रणनीती ते आखत आहेत. मार्टिनो यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले होते. त्‍यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली अर्जेंटिना संघाने  कोपा अमेरिका फुटबॉल चषक स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती.

हेही वाचा;

Back to top button