Ashton Agar: ॲश्टन एगरची ‘सुपरमॅन’ अवतारात फिल्डींग, षटकार रोखल्याचा अविश्वसनीय व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Ashton Agar: ॲश्टन एगरची ‘सुपरमॅन’ अवतारात फिल्डींग, षटकार रोखल्याचा अविश्वसनीय व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच सर्वकाही नसते. क्षेत्ररक्षण हा असा विभाग आहे की, जर संघाने चांगली कामगिरी केली तर त्याच्या जिंकण्याची शक्यता वाढते. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे दृश्य पाहायला मिळते, जे पाहून चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते, असेच काहीसे ॲडलेड ओव्हल मैदानावर पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲश्टन एगरने (Ashton Agar) सुपरमॅन अवतारात अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करून भल्याभल्यांना चकीत केले. त्याच्या या अविश्वसनीय फिल्डींगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इंग्लिश संघाच्या डावाचे 45 वे षटक खेळले जात होते. त्यांचा अक्रमक फलंदाज डेव्हीड मलान (Dawid Malan) स्ट्राईकवर होता. पॅट कमिन्सच्या (pat cummins) शॉर्ट बॉलवर मलानने अप्रतिम पुल शॉट खेळला आणि चेंडू षटकारासाठी जाईल असे वाटत होते पण स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या ॲश्टन एगरने (Ashton Agar) हवेत उडी मारून चेंडू पकडला आणि चपळाईने त्याने सीमारेषेपलिकडे पडताना हवेतच चेंडू मैदानात फेकून दिला. षटकार गेला असतात तर इंग्लंडला आपसुकच 6 धावा मिळ्या असत्या पण एगरच्या सुपरमॅन अवतारातील फिल्डींगने 1 धावच मिळाली. अशाप्रकारे एगरने कांगारू संघासाठी 5 धावा वाचवत मोलाची भूमिका बजावली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Cricket.com.au ने गुरुवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ॲश्टन एगरच्या (Ashton Agar) क्षेत्ररक्षणाचे दृश्य दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे, ‘हे क्रेझी आहे. ॲश्टन एगरचे अभिनंदन.’ हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो नेटक-यांनी पाहिला आहे. त्याच वेळी, 500 हून अधिक वेळा रिट्विट केला गेला आहे.

एगरच्या अचूक थ्रोवर रन आउट… (Ashton Agar)

ॲश्टन एगरने (Ashton Agar) या सामन्यात लियम डॉसनला धावबाद केले. त्याने एका हातात चेंडू पकडून तो चपळाईने थ्रो केला. त्याचवेळी एक धाव चोरणारा डॉसन त्याची शिकार झाला. एगरने गोलंदाजीत भलेही 10 षटकांमध्ये 62 धावा दिल्या असतील आणि त्याला एकही विकेट मिळाली नसेल, पण त्याने फिल्डींग करताना दिलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले (Australia Vs England). मलानच्या 128 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने केलेल्या 134 धावांच्या शतकी खेळीमुळे संघाला 50 षटकात 9 गडी गमावून 287 धावा करता आल्या. मलाननंतर जोस बटलर (29) आणि विली (34*) यांनी सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, कमिन्स आणि अॅडम झाम्पा यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी करत 3-3 विकेट घेतल्या. यात कमिन्सने 62 तर झाम्पाने 55 धावा दिल्या.

Back to top button