

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul Fails : भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल हा टी 20 विश्वचषकातील भारताचा सर्वात कमकुवत दुवा ठरला आहे. तो एकामागून एक सामन्यात खराब सुरुवात करत आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याच्या बॅटमधून फक्त 4 धावा आल्या. दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सच्या कमकुवत संघाशी सामना होता. या सामन्यात राहुल चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती पण त्याने पुन्हा निराशा केली. नवख्या नेदरलँड्स संघाविरुद्ध फलंदाजी करतानाही राहुल फसला. त्याने अवघ्या 9 धावा करून पॅव्हेलियनकडे रवाना झाला.
आयपीएल 2022 नंतर केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात तो संघाचा भाग होऊ शकला नाही. तंदुरुस्त झाल्यानंतर आशिया चषक 2022 च्या आधी, संघ व्यवस्थापनाने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाचा भाग बनवले. या दौऱ्यासाठी यापूर्वी घोषित कर्णधार शिखर धवनच्या जागी केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. आशिया कपच्या तयारीसाठी त्याला ही जागा देण्यात आली होती पण या दौऱ्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. या दौऱ्यावर त्याने 2 एकदिवसीय सामन्यात केवळ 31 धावा केल्या.
केएल राहुलने आशिया कपमध्ये एकूण 5 सामने खेळले. या स्पर्धेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली. दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुल गोल्डन डकवर बाद झाला. तर हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने अतिशय संथ गतीने 39 चेंडूत 36 धावा केल्या. सुपर 4 फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा क्रिझवर स्थिरावण्यासाठी बरेच चेंडू खेळले. अखेर त्याची गाडी 28 धावांवर थांबली. श्रीलंकेविरुद्ध करो वा मरोच्या सामन्यात त्याने 7 चेंडूत 6 धावा केल्या. त्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला. याचबरोबर टीम इंडियाचा आशिया कप स्पर्धेतील प्रवास थांबला. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात राहुलने अफगाणिस्तानविरुद्ध 150 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 41 चेंडूत 62 धावा केल्या. पण भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याची ही खेळी निरर्थक असल्याचे अनेकांनी म्हटले.
टी 20 विश्वचषकापूर्वी राहुलने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेतील पाच डावांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती. यादरम्यान त्याने चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तो पूर्ण जोमात असल्याचे दिसत होते. मात्र, विश्वचषक सुरू झाल्यानंतर तो पुन्हा फुसका बार निघाल्याची त्याच्यावर अनेकांनी टीका केली. आशिया चषकाप्रमाणेच आता तो वर्ल्ड कपमध्येही तो गोंधळलेला दिसत आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध 'नथिंग शॉट' खेळण्याच्या नादात तो बोल्ड झाला. तर नेदरलँड्सविरुद्ध खराब फुटवर्कने त्याचा घात केला आणि तो LBW झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकात आतापर्यंत त्याने दोन डावात केवळ 13 धावा केल्या आहेत आणि त्यासाठी त्याने एकूण 20 चेंडू खेळले आहेत.
केएल राहुलचा संघात जबरदस्त बॅकअप आहे. आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर त्याला खूप विरोध झाला होता. काही दिवसांनी कर्णधार रोहित आणि विराट कोहली यांनी केएल राहुलची पाठराखण करत तो एक खास खेळाडू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सर्व अपयशानंतरही द. आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्यात तो नक्कीच सलामीला येईल यात शंका नाही.