कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूही टी-20 विश्वचषक खेळू शकणार; जाणून घ्या ICC च्या नवीन अटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीच्या नवीन अटींनुसार, कोविड-19 पॉझिटिव्ह खेळाडूही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार आहेत. संघाच्या डॉक्टरांना खेळाडूने खेळणे योग्य वाटत असेल आणि परवानगी दिल्यास त्याला संघातून वगळले जाणार नाही. जर खेळाडू स्वतः खेळण्यास तयार नसेल, तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याचीही परवानगी संघाला दिली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 विश्वचषक 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंना मोठा दिलासा दिला आहे. याआधी कोविड-पॉझिटिव्ह खेळाडूंना संघातील इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवले जात होते. आता एखादा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असूनही डॉक्टरांनी खेळण्यास परवानगी दिली तर तो खेळाडू खेळू शकतो. आयसीसीने जाहीर केले आहे की, कोणत्याही कोविड पॉझिटिव्ह खेळाडूला अलगीकरण केले जाणार नाही. यापूर्वी, एखाद्या खेळाडूच्या जवळच्या मित्रांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले, तरीही त्यांचे अलगीकरण केले जात होते. दरम्यान, आता स्पर्धेवेळी कोणतीही अनिवार्य कोविड चाचणी केली जाणार नाही. २०२० पासून खेळाडूंनी असंख्य COVID-19 चाचण्या दिल्या आहेत, यापुढे त्यांना या चाचण्या द्याव्या लागणार नाहीत.
टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सामना काल (दि.१६ ) जिलॉन्ग येथे झाला. अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना देखील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरच होणार आहे.
हेही वाचा :
- T20 World Cup : वेस्ट इंडिजचा स्कॉटलंड विरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- Share Market Today | कमकुवत जागतिक संकेतामुळे सेन्सेक्सची घसरणीसह सुरुवात, क्रिप्टोकरन्सी बाजार तेजीत
- नायजेरियात दशकातील सर्वात भीषण पूर; ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू, उपासमारीची परिस्थिती