पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजेरियाला सध्या दशकातील सर्वात भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १३ लाखांहून अधिक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. यापूर्वी २०१२ मध्येही देशाला पुराचा सामना करावा लागला होता. तेव्हाही २१ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले होते, तर ३६३ लोकांचा मृत्यू झाला होता.
नायजेरियाच्या मानवतावादी व्यवहार मंत्रालयाने ट्विटरवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपत्तीमुळे १३ लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यास भाग पाडले आहे. मानवतावादी व्यवहार मंत्री सादिया उमर फारूक यांनी सांगितले की, दुर्दैवाने १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६०३ हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पुरामुळे ८२ हजार हून अधिक घरे आणि सुमारे १ लाख १० हजार हेक्टर शेतजमीन पूर्णपणे नष्ट झाली आहे. गेल्या आठवड्यात मृतांची संख्या ५०० होती. नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (NEMA) ने सांगितले की, २०१२ मध्ये पुरामुळे ३६३ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच २१ लाखाहून अधिक लोकांना विस्थापित करण्यात आले होते.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक वस्तूंवरील निर्बंध आणि वाढत्या महागाईने जगातील अनेक देशांवर उपासमारीची वेळ आली आहे. जागतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायजेशनने गेल्या महिन्यात म्हटले आहे की, नायजेरिया हा भूकेच्या विनाशकारी पातळीचा सामना करणाऱ्या सहा देशांपैकी एक आहे.
हेही वाचा :